भिवंडी-वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच; राजकीय पक्षांची बघ्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:34 AM2020-08-27T00:34:50+5:302020-08-27T00:35:14+5:30

ठेकेदाराचे उखळ पांढरे?, आंदोलक कार्यकर्ते वेठीस

Only potholes left on Bhiwandi-Wada highway; The role of political parties | भिवंडी-वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच; राजकीय पक्षांची बघ्याची भूमिका

भिवंडी-वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच; राजकीय पक्षांची बघ्याची भूमिका

googlenewsNext

वाडा : भिवंडी-वाडा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे नित्याचीच वाहतूककोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. यातून नागरिकांची सुटका व्हावी आणि रस्ता गणपती सणापूर्वीवाहतुकीस योग्य व्हावा म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुडूस नाक्यावर अलीकडेच रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता गणपती सणापूर्वी वाहतुकीस योग्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र थातूरमातूर खड्डे भरले गेले, त्याने प्रश्न काही सुटलेला नाही. आजही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे दिसून येत आहे.

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने दि.१८ रोजी रास्ता रोको आंदोलन केले गेले होते, परंतु आंदोलन संपताच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यात हा विषय बाजूला राहिल्याने या वर्षीही गणपती बाप्पांचे आगमन खड्डे तुडवतच झाले. याचे राजकीय पक्षांना काहीही सोयरसुतक नसल्याने थातूरमातूर खड्डे भरून ठेकेदाराने मात्र उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप केला जात आहे.

वाडा-भिवंडी-मनोर या महामार्गावरील डाकिवली फाटा ते वाडा या २० कि.मी. अंतराच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचा ठेका जय भारत कंस्टक्शन कंपनीला ३ कोटी रुपयांना देण्यात आला असून यामध्ये त्यांनी उन्हाळा व पावसाळा या दोन्ही मोसमात रस्त्याची दुरुस्ती करायची आहे. परंतु सद्यस्थितीत सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे केल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून दोन खासदार, तीन आमदारांचा हा तालुका, मात्र रस्त्यांसह अनेक सोयी-सुविधांपासून कोसो मैल दूर आहे.
भिवंडी-वाडा-मनोर रस्ता बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर सरकारने सुप्रीम इन्फास्टक्चर या कंपनीला दिला होता, मात्र १० वर्षे लोटल्यानंतरही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. १६ कि.मी. अंतरावर वन विभागाची हद्द असल्याने तेथील रस्ता दुपदरीच आहे. देहजे, पिंजाळ या नद्यांवरील पुलांची कामे आजपर्यंत अपूर्णच आहेत. वाडा-भिवंडी-मनोर महामार्गांचे काम निकृष्ट झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खड्डेमय होतो व दरवर्षीदुरुस्तीवर करोडो रुपये खर्च होतात. या वर्षीही तीच अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. त्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि.२१ आॅगस्टपर्र्यंत रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून सद्यस्थितीत या रस्त्याची चाळण झालेली आहे.

या महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम नियमित सुरू असून रस्त्यावर पाणी साचत असल्याने कामात अडथळा निर्माण होत आहेत. परंतु १०० टक्के काम पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. - ए.एम. बरसट, शाखा अभियंता, बांधकाम विभाग, वाडा

रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्याचा पाया मजबूत नसल्याने एका जागेवरील खड्डा भरला की, लगेच दुसऱ्या ठिकाणी खड्डा पडतो आहे. २१ तारखेपर्यंत सर्व खड्डे भरले होते. त्याची व्हिडीओ क्लिपही आम्ही बनवली आहे. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पडत आहेत. तरीही रस्ता लवकरच लवकर सुस्थितीत करण्यात येईल. - विवेक पवार, ठेकेदार

Web Title: Only potholes left on Bhiwandi-Wada highway; The role of political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे