घोलवड पुलानजीक टाकल्या इंजेक्शनच्या निडल्स उघडयावर
By admin | Published: February 15, 2017 11:31 PM2017-02-15T23:31:54+5:302017-02-15T23:31:54+5:30
डहाणू-बोर्डी मार्गाच्या दुतर्फा राख, प्लास्टीक कचरा, कुजके अन्न पदार्थ टाकण्याचे प्रकार वाढले असतांनाच आता घोलवड पूलालगत इंजेक्शनच्या
अनिरुद्ध पाटील / बोर्डी
डहाणू-बोर्डी मार्गाच्या दुतर्फा राख, प्लास्टीक कचरा, कुजके अन्न पदार्थ टाकण्याचे प्रकार वाढले असतांनाच आता घोलवड पूलालगत इंजेक्शनच्या निडल, काचेच्या बाटल्यांचे तुकडे व इतर कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे वाटसरु आणि प्राण्यांना इजा पोहचण्यासह स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लागल्याने दोषींवर कारवाईची मागणी घोलवड ग्रामस्थांनी केली आहे.
डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग अवैध व अवजड वाहतुकीमुळे धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा नरपड, चिखले आणि घोलवड या गावच्या हद्दीत ठिकठिकाणी प्लास्टीक कचरा, कुजके अन्न पदार्थ उघड्यावर टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधीसह परिसराला बकाळ स्वरूप आले आहे. रविवारी घोलवड पूलानजीक एका वाहनातून माती व कचरा उघड्यावर टाकण्याचा प्रकार समोर आला. त्यामध्ये इंजेक्शनच्या निडल, फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे व इतर सामुग्री आहे. या मार्गावरून मरवाड आणि टोकेपाडा भागातील विद्यार्थी, महिला, चाकरमानी आणि सकाळ-संध्याकाळ चालण्याचा व्यायामाला येणाऱ्यांची वर्दळ असते. गरिबीमुळे स्थानिक अनवाणी प्रवास करीत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनास्थळानजीकचे कांदळवन वस्तीपासून लांब असल्याने येथे नेहमी अज्ञाताकडून कचरा टाकून पेटवला जातो. त्यामुळे जैव विविधतेला धोका पोहचतो. कांदळवनाच्या संरक्षणाची जबाबदारी बोर्डी वन परिक्षेत्र आणि महसूल विभागाची असतांना दुर्लक्ष केले जाते. तर घोलवड ग्रामपंचायतीकडून स्वच्छ भारत सक्षमपणे राबवली जात नसल्याचे दिसून येते आहे. दरम्यान आरोग्य विभागाशी संबंधीत साहित्य वापरानंतर उघड्यावर टाकल्याने सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली आहे. हा विषय केवळ ग्रामपंचायतीशी निगडीत नसून पालघर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देणे आवश्यक आहे.