ग्रामसेवकांची चालूगिरी
By admin | Published: October 11, 2016 02:41 AM2016-10-11T02:41:13+5:302016-10-11T02:41:13+5:30
माहिती अधिकारा अंतर्गत तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विचारलेली माहिती देण्यात ग्रामसेवकामध्ये अनास्था दिसून येत
सुरेश काटे / तलासरी
माहिती अधिकारा अंतर्गत तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विचारलेली माहिती देण्यात ग्रामसेवकामध्ये अनास्था दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये घरकुलांचे कामात, व जण सुविधांच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे जाणवत आहे. आदिवासी लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत घरकुलाचा निधी हडपण्यात आला असल्याची चर्चा होती. त्यामुळे तलासरी तालुक्यातील आदिवासी लाभार्थी घरकुला पासून वंचित आहेत वा त्यांची घरकुले अर्धवट आहेत.
या घरकुलांचे कामाची माहिती घेण्यासाठी काजळी, करंजगाव, कोदाड, सावरोली, वडवली, वसा, संभा, डोंगारी, गिरगाव, उपलाट, झरी, वरवाडी व झाई ग्रामपंचायतींना माहिती अधिकाराचे अर्ज देण्यात आले. पण घरकुलांचे व जन सुविधांच्या कामाची माहिती दडविण्याचा प्रकार सुरु आहे का? असा प्रश्न अर्जदाराकडून विचारला जात आहे. याप्रकरणी तलासरी पंचायत समिती विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे अपील करण्यात आले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी तथा अपिलीय अधिकारी बापुसाहेब नाळे यांच्या समोर झालेला सूनावणीस तब्बल १३ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक माहिती घेऊन न येता हात हलवीत आले. महत्वाचे म्हणजे त्यातील फक्त सहाच जण यावेळी उपस्थित होते. जन माहिती अधिकाऱ्याने चार दिवसात अपीलकर्त्यास माहिती द्यावी असा आदेश अपिलीय अधिकारी यांनी दिला. मात्र त्याकडेही या ग्रामसेवकांनी पाठ केली आहे.