अनैतिक संबंधांना विरोध: पत्नीने केला पतीचा खून
By admin | Published: July 24, 2015 03:34 AM2015-07-24T03:34:24+5:302015-07-24T03:34:24+5:30
पालघरमधील शिक्षक समीर हरेश्वर पिंपळे हे त्यांची पत्नी व तिचा मित्र संतोष संखे यांच्यामधील विवाहबाह्य संबंधांच्या आड येत असल्याने
पालघर : पालघरमधील शिक्षक समीर हरेश्वर पिंपळे हे त्यांची पत्नी व तिचा मित्र संतोष संखे यांच्यामधील विवाहबाह्य संबंधांच्या आड येत असल्याने त्या दोघांनी संगनमत करून समीरची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पालघर पोलीसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पालघरच्या देलवाडी हायस्कूल मध्ये शिक्षक असलेले समीर व दातिवरे शिक्षिका पत्नी समीधा आणि सात वर्षाच्या मुलाबरोबर राहत होते. समीधाचे पालघर येथील टुरीस्टचा व्यवसाय करणाऱ्या संतोष यादव संखे यांच्याशी संबंध असल्याचे समीरला कळल्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये नेहमीच खटके उडत असत.
९ जुलै रोजी त्यांच्या फ्लॅटमधील बाथरूममध्ये समीर मृतावस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नैसर्गिकपणे झाल्याचे त्याच्या पत्नीकडून भासवले जात होते. पालघर पोलीसांनीही याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु मुलाच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा तसेच तोंडातून रक्त येत असल्याने आपल्या मुलाचा खुन करण्यात आल्याची तक्रार समीरचे वडील हरेश्वर पिंपळे यांनी पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडे केली होती.
याबाबत लोकमतमध्ये २० जुलैला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवून समीधा आणि तिचा प्रियकर संतोष यांनी संगनमत करून समीर झोपलेला असताना उशीने तोंड दाबून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पालघरचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक बी. जी. यशोद यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समीधाने गुन्ह्णाची कबुली दिल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)