ग्रामसेवकाविरोधात मोर्चा, आलोंडा ग्रामपंचायतीला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:19 AM2018-08-15T02:19:40+5:302018-08-15T02:19:58+5:30
विक्रमगड तालुक्यातील आलोंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला.
तलवाडा - विक्रमगड तालुक्यातील आलोंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला.
एकीकडे प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल व काम करणाऱ्यास दाम मिळेल असे शासनाचे धोरण असताना ग्रामसेवकांने रोजगार हमीतून कामे करुनही मजुरांना मजुरी देत नसल्याचे येथे उघड होत आहे. तसेच, सर्व-सामान्य नागरिकांनी घरे बांधुन त्यास घरपट्टी लागू करण्यासंदर्भात मागणी करुनही त्या दिल्या जात नाहीत, विविध विकास कामे वेळकाढू पणामुळे अपूर्णावस्थेत आहेत. अशा अनेक कामामध्ये ग्रामसेवक आपली मनमानी करीत असल्याचे लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाही होत नसल्याने श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले. या संदर्भामध्ये संघटेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, इशारा देऊनही त्यावर उपाय योजना होत नसल्याने अखेर सोमवारी आलोंडा ग्रामपंचायतीवर ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारा विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकºयांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल चार तास धरणे आंदोलन केले. अखेर सर्व कामे करण्याचे ग्रामसेवकानी लेखी आश्वासनासह तत्काळ १५ लोकांना घरपटी दिल्यानंतर व विहिरी साफ केल्याचे वीस हजार पाचशे रुपये अदा केल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला़
तुषार सांबरे, रुपेश डोले यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीसी कैलास तुंबडा, तालुका अध्यक्ष शंकर भोये, महिला जिल्हा उपाध्यक्ष सविता कासट, माजी तालुका अध्यक्ष गंगाराम वरठा,कामगार संघटना सचिव पौर्णिमा पवार, महिला सचिव गिता लोहार, शहरप्रमुख मेहुल पटेल, युवा सचिव लवेश कासट यांसह असंख्य महिला व पुरुष कार्यकते उपस्थित होते.
सर्व कामे पूर्ण होतील दिले आश्वासन
ग्रामसेवकानी दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये वृक्ष लागवडीचे ३० हजार २० आॅगस्ट पर्यंत व पुढील दोन महिन्यात २० हजार रुपये अदा करण्यात येतील, स्वत:ची जागा असेल तर जागेच्या पुराव्यावर शासनाच्या जीआरप्रमाणे घरपट्टया देण्यात येतील, अपूर्ण कामे पुर्ण करण्याबाबत या सर्व दुरुस्ती करणे व अपुर्ण कामे पुर्ण करणे आदी आश्वासने दिली.