कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणारे मोकाट
By admin | Published: May 28, 2017 02:59 AM2017-05-28T02:59:25+5:302017-05-28T02:59:25+5:30
तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस
- पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस झाल्यानंतरही त्याची नोंद योग्य रित्या पोलिसांनी केलेली नाही. तसेच त्याला जबाबदार असणारे अधिकारीही त्यामुळे मोकाट राहीले आहेत.
या तपासाला गती मिळाली नसून या घटनेची तारापूर पोलिसात अजूनही या घटनेची नोंद हलगर्जी इतकीच आहे. तर किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेण्याचे नियम धाब्यावर बसविल्यानेच हा मृत्यू घडला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यानुसार तपास करून त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे
७ एप्रिलला अंदाजे सहा टन वजनाची व सात फुट उंचीची किरणोत्सर्गी घनकचऱ्याने (स्पेन्ट फ्यूएल) ने भरलेली टाकी तारापुरच्या अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधून जवळच असलेल्या भाभा अणु संशोधन केंद्रा (बी .ए .आर .सी.) मध्ये फोर्कलिफ्ट वरुन पुढील प्रक्रि ये करीता नेण्यात येत होत. मात्र, ही टाकी उंच असल्याने फोर्कलिफ्ट च्या चालकला २५ ते ३० फुटाच्या पुढील भागच दिसत नव्हता तर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी पुढे मागे पायलट वाहन तसेच ट्रॅफीक कंट्रोलच्या मदतीसाठी कुणीही न ठेवल्यानेच कोरे या निष्पाप कर्मचाऱ्याचा (जे पुढील वर्षी ३० नोव्हेंबर ला सेवा निवृत्त होणार होते) नाहक बळी गेला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
तारापुर अणु ऊर्जा केंद्र आयएसए १८००१ प्रमाणित असल्याने धोकादायक किरणोत्सर्गी घन कचरा (स्पेन्ट फ्यूएल) सारख्या वस्तुंची फोर्कलिफ्ट वरु न वाहतूक करतांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि ए. इ. आर. बी. च्या नियम आणि मापदंडानुसार स्टॅँडर्ड आॅपरेटिंग प्रोसीजर (एस.ओ.पी ) चे काटेकोर पणे पालन होणे अपेक्षित होते त्याची अंमलबजावणी केली की, नाही? त्याची जबाबदारी कुणावर होती याचा तपास एन. पी. सी. आय . एल. च्या वरिष्ठ पातळीवरून आणि पोलिसांकडून तत्परतेने होणे गरजेचे असतांनाही दिरंगाई होत आहे.
- तारापुर पोलिसांनी दि १० एप्रिलला तारापुर अणु ऊर्जा केंद्र प्रशासनला पंधरा प्रश्नाचे पत्र दिले आहे. त्या लाही आता ४६ दिवस झाले परंतु त्या पत्राचे उत्तर अजून देण्यात आले नाही. त्यामुळेच दोषीवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. व कोरे कुटुंबाला न्यायही मिळालेला नाही.