ऑर्केस्ट्रा बार कारवाई; आयुक्त उतरले रस्त्यावर, मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर ॲक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:37 AM2024-06-30T06:37:56+5:302024-06-30T06:38:04+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिकेने सुरू केलेल्या बारवरील कारवाईसाठी पोलिस आयुक्त मधुकर पांडेय आणि पालिका आयुक्त संजय काटकर हेही रस्त्यावर उतरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिकेने ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारपासून कारवाई सुरू केली आहे. शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी स्वतः रस्त्यावर उतरत २ ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त करायला लावले, तर काशीमीरा भागातील १५ बार - लॉजना पालिकेने कारवाईसाठी नोटिसाही बजावल्या आहेत.
नशेचा बाजार मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बार, लॉज आदींच्या अनधिकृत बांधकामांचा आढावा घेऊन कारवाईचे आदेश दिले. गुरुवारी मीरा रोडच्या शीतलनगर येथील ऐश्वर्या, बिंदिया व टाइमलेस, कनकिया नाका येथील अंतःपुरा आणि नयानगरमधील आर के इन बार - लॉज अशा ५ बारच्या बेकायदा पत्रा शेड, बार, किचन आदी वाढीव अनधिकृत बांधकामांवर केली गेली. शुक्रवारी काशीमीरा महामार्गावरील संगीत ऑर्केस्ट्रा बार पूर्ण जमीनदोस्त केला.
मीना ढाबा, केम छो, स्टार नाइट, नाइट लवर, के नाइट, सत्यम पॅलेस, सेटरडे नाइट, माय होम, सिझन हॉटेलचे शेड, तसेच वाढीव बांधकाम तोडले गेले. उपायुक्त रवी पवार, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रेंसह कनिष्ठ अभियंता, कर्मचारी यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.
दोन बार पूर्णपणे जमीनदोस्त
शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर व पोलिस आयुक्त मधुकर पांडेय हे स्वतः कारवाईसाठी उतरले होते. काशीमीरा महामार्गावरील केम छो आणि एमपी पॅलेस हे दोन ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त केले. केम छो ऑर्केस्ट्रा बारचे थोडे वाढीव बांधकाम शुक्रवारी तोडले होते, परंतु बार पूर्ण जमीनदोस्त न केल्याबद्दल आरोप होऊ लागल्यानंतर शनिवारी तो पूर्ण तोडण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडही उपस्थित होते.