रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहने हटवण्याचा आदेश कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:38 PM2021-02-08T23:38:48+5:302021-02-08T23:38:56+5:30

अंमलबजावणी झाली नाही; नागरिकांसह वाहनचालक त्रस्त

Order to remove road debris, unattended vehicles on paper only | रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहने हटवण्याचा आदेश कागदावरच

रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहने हटवण्याचा आदेश कागदावरच

Next

पारोळ : वसई-विरार शहर महापालिकेने मध्यंतरी काढलेल्या भंगार, बेवारस वाहने हटविण्याच्या आदेशाला पालिका प्रशासनानेच धाब्यावर बसविले आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे संयुक्तिक असताना महापालिका अधिकाऱ्यांनी हा आदेशच धाब्यावर बसविला आहे. रस्त्याच्या कडेला असलेली भंगार, बेवारस वाहने हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच हालचाल हाेत नसल्यामुळे नागरिकांना वाहनचालकांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे.

१५ डिसेंबर २०२० रोजी वसई-विरार शहर महापालिकेने शहरातील भंगार, बेवारस वाहने हटविण्यासंदर्भात आदेश पारित केला आहे. मात्र, या आदेशाची अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेवारस, भंगार आणि अपघातग्रस्त वाहने रस्ताेरस्ती उभी आहेत. या वाहनांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, नागरिकांना पादचाऱ्यांनाही त्यांचा अडथळा होत असल्याचे दिसत आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छतेलाही अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर ती हटवण्यासंदर्भातचे आदेश महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी पारित केले होते. महापालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशात भंगार, बेवारस, अपघातग्रस्त वाहने व सामान जप्त करण्याची प्रक्रिया महापालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

या आदेशानुसार महापालिकेकडून या वाहनांवर अथवा सामानावर २४ तासांत ते हटविण्याबाबतची नोटीस चिकटवण्यात येईल, असे म्हटले हाेते. तसेच जप्तीची कारवाई केल्यापासून प्रतिदिन २०० रुपयांचा दंड व वाहने हटविण्याचा खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले हाेते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही.

प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भातील सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या आदेशानुसार त्या त्या विभागाचे अतिक्रमण कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या भागातून बेवारस वाहने टोइंग करून प्रभाग समिती आवारात जमा करतात. या बेवारस वाहनांची संख्या किती आहे; याची माहिती त्या त्या प्रभागातून घेऊन आपल्याला माहिती दिली जाईल.
गणेश पाटील, 
जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार महापालिका 

Web Title: Order to remove road debris, unattended vehicles on paper only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.