अर्नाळ्यातील नौका बुडाली, वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी मोठी जहाजे मासेमारीच्या मार्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:18 AM2017-10-06T01:18:28+5:302017-10-06T01:19:06+5:30
मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले.
शशी करपे
वसई : अर्नाळ््यातील याकोबा या मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले. धडकेमुळे नौकेचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अर्नाळ््यातील जॉन्सन थाटू यांच्या मालकीची याकोबा बोट मासेमारीसाठी खोल समुद्रात गेली आहे. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास गुजरातमधील जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर एका कार्गो जहाजाने याकोबा बोटीला जोराची धडक दिली. त्यामुळे बोट खोल समुद्रात बुडाली. सुदैवाने त्याठिकाणी जाफराबाद येथील मासेमारी करणाºया बोटीवरील खलाशांनी याकोबा बोटीवरील खलाशांना वाचवून सुखरुपपणे किनाºयावर आणले. मात्र, बोटीला वाचवण्यात यश आले नाही. बोटीला फायबर बॉल बसवण्यात आले असल्याने समुद्रातून तिला बाहेर काढण्यात आले. सरकारने समुद्रात मासेमारी बोटींसाठी परिसर राखून ठेवला आहे. त्या परिसरातून जाण्यास कार्गो आणि मोठ्या जहाजांना बंदी आहे. मात्र, मुंबईकडे येणारी जहाजे वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी आपला मूळ मार्ग बदलून मासेमारी परिसरातून ये-जा करतात. त्यातूनच अपघात वाढू लागले आहेत. सदरचे प्रकार रात्रीच्याच वेळी होत असल्याने अपघात करणाºया जहाजांना शोधून काढता येत नाही. २००७ साली माठक यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने पाचूबंदर येथील मासेमारी बोटीला धडक देऊन पळालेल्या परदेशी कार्गो जहाजाला शोधून काढले होते. याप्रकरणी ऐलोगेट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंटरपोलच्या मदतीने पोलिसांनी जहाज मालकाला नोटीस बजावली होती. त्यानंतर जहाज कंपनीने समझौता करून नऊ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली होती.
ठोकर देऊन कार्गाे जहाजे पळून जातात. अपघातग्रस्त मच्छिमार स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने जहाजांचे क्रमांक त्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे अशा जहाजांना शोधणे कठीण होते. पण, आता अपघात झाल्यानंतर जहाजे शोधून काढून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच मार्ग बदलण्याºया जहाजांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मुंबईत येणाºया कार्गो जहाजांनी गेल्या पंधरा वर्षात पाचूबंदर, अर्नाळा आणि उत्तन परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक मासेमारी बोटींना धडक दिल्याचे प्रकार घडले आहेत. यात अद्यापपर्यंत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र, प्रत्येक बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पाचूबंदर मच्छिमार संस्थेचे संचालक दिलीप माठक यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी बोटीला अर्नाळा समुद्रकिनारी आणण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली.