ब्रेन डेड महिलेच्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:52 PM2019-01-03T14:52:46+5:302019-01-03T14:52:51+5:30
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात ४८ वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अवयवदानाच्या परवानगीमुळे तीन जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली.
भाईंदर - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात ४८ वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अवयवदानाच्या परवानगीमुळे तीन जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली. ब्रेनडेड झालेली महिला विरार येथील रहिवासी होती.
ब्रेनडेड महिला 22 डिसेंबर 2018 रोजी चक्कर येऊन पडली. यानंतर तिला त्वरीत स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ती कोमात गेल्याने तेथील डॉक्टरांनी तिला सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. यानंतर त्या महिलेला मीरारोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुमारे 9 दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना अखेर डॉक्टरांनी तिला 31 डिसेंबर 208 रोजी ब्रेनडेड घोषित केले. त्याचवेळी डॉक्टरांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना अवयव दानाबाबत माहिती देत अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत त्या महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाला त्वरीत परवानगी दिली. यामुळे वेळ न दडवता त्या महिलेची एक किडनी याच रुग्णालयातील एका रुग्णाला, यकृत मुंबईच्या खासगी रुग्णालयातील रुग्णाला तर डोळे (कॉर्निया) मुंबईच्याच रोटरी क्लबच्या आय बँकेला दान करण्यात आले.
या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाल्याने त्यांना नवीन वर्षात अमूल्य भेट मिळाली. तर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्या महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाची दिलेली परवानगी प्रशंसनीय असल्याचे हिरवाणी यांनी सांगितले. मृत्युपश्चात एका मृत शरीरातील अवयवदानामुळे किमान सात जणांना जीवनदान मिळू शकते. भारतात आजही लाखो रुग्ण अवयव दानाच्या प्रतीक्षेत असून अजूनही अवयवदानाविषयी अनेक गैरसमज असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.