स्मशानाला जीवनदानाचे जंक्शन बनवू या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:49 PM2020-02-26T22:49:41+5:302020-02-26T22:52:14+5:30
अवयवदान जनजागृती; स्मशानभूमीतच केले कार्यक्रमाचे आयोजन; कला शिबिर, स्पर्धाही संपन्न
पालघर : मृत्यूपश्चात स्मशानाला अंतिम स्थानक म्हणण्यापेक्षा देहदान, अवयवदान करून स्मशानाला जीवनदानाचे जंक्शन बनवू या, असे आवाहन सफाळ्यात आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले. ‘चला बदलूया’ या देहदानाच्या आगळ्यावेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद लाभला.
अवयवदानाचा महत्त्वपूर्ण संदेश जनमानसात रुजावा, त्याचा प्रसार व्हावा यासाठी मीनाताई मधुकर राऊत कला संकुल सफाळे, कॅम्लिन मटेरियल आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन, मुंबई या संस्थांनी सफाळे येथे या कार्यक्र माचे आयोजन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्यक्ष स्मशानभूमीतच करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ज्या ठिकाणी आपला देह जाळून नष्ट केला जातो, तेथेच आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे महत्त्व समजावून सांगत अवयवदानासाठी प्रेरित करण्याची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता.
अपघातात मृत्यू पावलेल्या अनेक लोकांचे सुस्थितीत असलेले अवयव जाळून नष्ट केले जातात. पण, तेच जर दान करण्यात आले तर अंधांना दृष्टी मिळू शकते, अनेक दिव्यांग आपल्या अपंगत्वावर मात करीत सुस्थितीतील आयुष्य जगू शकतात. देहदानाचे अगदीच अत्यल्प असलेले प्रमाण वाढावे हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सफाळ्याच्या स्मशानभूमीत कला शिबिर, कला स्पर्धा आणि कला प्रदर्शन आयोजित केले होते. महिला, विद्यार्थी, शिक्षकांनी या कार्यक्र मात सहभाग घेतला. यावेळी अमृता शेरगिल यांचे जीवनपट मांडणारे दोन अंकी नाटकांचे सादरीकरण केले गेले.
जिल्हास्तरीय निबंधस्पर्धा
देहदान व अवयवदान या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय भगिनी समाज, पालघर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता योगेश वर्तक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रसिद्ध साहित्यिका, लेखिका वीणा गवाणकर यांच्या शुभहस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, कॅम्लीन कोकियोतर्फे पोस्टर कलर आणि रोख ५ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.