बेकायदा रेती उपसा, फोफावणारी अतिक्रमणे मुळावर, वसईचे नष्टचर्य सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:36 PM2019-03-04T23:36:24+5:302019-03-04T23:36:31+5:30
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे.
वसई : वसई तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गरम्य असा सागरी किनारा लाभला असला तरी वसई खाडीत बिगर क्रमांकाच्या पडावांमधून होत असलेला बेकायदा रेती उपसा, किनाऱ्यालगत फोफावत असलेली परप्रांतियांची अनिधकृत वस्ती, अतिक्रमणे आणि कायम निर्मनुष्य दिसून येणारी सुरु ची बाग यामुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा संभव असून भारत-पाक संबंधांमधील तणावाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे. यासंदर्भात संघटनेने वसई पोलिसांनी निवेदन देऊन कोणत्या बाबी सागरी सुरक्षेला बाधक ठरू शकतात, याबाबत माहिती दिली.
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव व दहशतवादाचे असलेले सावट लक्षात घेऊन मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाशर््वभूमीवर सागरी सुरक्षेबाबतचे एक निवेदन कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी वसई पोलिसांना दिले असून सागरी सुरक्षेला बाधक ठरण्याचा संभव असलेल्या किनारपट्टीवरील काही गैरबाबी पोलिसांच्या निदर्शनास आणल्या आहेत. वसईच्या खाडीत अनिर्बंधपणे बेकायदा रेती उपसा सुरू आहे. रेती उपसा करणाऱ्या पडावांवर कोणत्याही प्रकारचे नोंदणी क्र मांक नसतात. शिवाय या पडावांवर काम करणारे मजूर हे परप्रांतीय असतात. त्यांच्याकडे त्यांची ओळख पटविणारे पुरेसे पुरावेही नसतात. कस्टम आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयाच्या समोरील खाडीतून या बेकायदा पडावांची ये-जा सुरू असते. यावर कोणत्याही यंत्रणेचा वचक नाही. त्यामुळे याठिकाणच्या बेकायदा पडावांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेकायदा पडावांवर आणि त्यावर काम करणाºया परप्रांतीय खलाशांवर कारवाई करण्याची मागणी सौदिया यांनी केली आहे. मध्यंतरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वसई खाडीत कारवाई करून अशा प्रकारचे बेकायदा पडाव आणि मजुरांना ताब्यात घेतले होते, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणली आहे.
वसई कोळीवाड्यातील शासकीय गोदामांच्या मागे बेकायदा वस्ती वेगाने फोफावत आहे. या ठिकाणी कोण, कुठून येतो यावर कसलाही धरबंद राहिलेला नाही. या भागात गुन्हेगारी पाशर््वभूमीच्या इसमांचा वावर असून ही बाब सागरी सुरक्षेकरिता धोकादायक ठरू शकते. असे असतांनाही याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था चिरीमिरीच्या मोबदल्यात या भागातील बेकायदा वास्तव्य करून असलेल्यांना वीज, पाणी, रेशनकार्ड अशा सर्वप्रकारच्या सुविधा पुरवितात. या भागात पोलिसांची गस्त ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. पाचूबंदर येथे हिंदू स्मशानभूमीच्या मागे स्थानिक मच्छिमारांच्या बोटींची कामे चालतात. या बोटींवर पावसाळ्याच्या काळात बोटींतील मशिनरीच्या किंमती भागांची चोरी होण्याचे प्रमाण वाढीस लागले असून आजूबाजूला वाढत असलेल्या बेकायदा वस्तीतील गुन्हेगारी पाशर््वभूमीचे इसम या चोºया करत असाव्यात असा संशय आहे. शिवाय शासकीय गोदामांच्या आजूबाजूला गर्दुल्ल्यांचाही सुळसुळाट झाला आहे.