कोरोना काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य, शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:49 AM2021-12-26T00:49:49+5:302021-12-26T00:50:35+5:30
कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
वसई - कोरोना महामारीच्या कठीण काळात सर्वधर्मीय बांधवांचे ऐक्य व शांतीसाठीची वचनबद्दता हेच आपले खरे उद्दिष्ट असेल, असा संदेश वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांनी सर्वधर्म मैत्री प्रार्थना मेळाव्यात दिला. शनिवार वसई धर्मप्रांतात नाताळ निमित्ताने सर्वधर्ममैत्री प्रार्थना मेळाव्याचे आयोजन गिरीज येथील जीवन दर्शन केंद्रात केले होते, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यासंदर्भात आर्च बिशप यांचे सचिव फा. रिचर्ड डाबरे यांनी लोकमत माहिती दिली.
या प्रार्थना मेळाव्यास विविध धर्माचे नेते व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीं बिशप डॉ. मच्याडो यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित होती. दरम्यान, नाताळ गीतानंतर प्रार्थनेद्वारे या कार्यक्रमाची सुरवात झाली. फा. रिचर्ड डाबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.
कोरोना महामारीच्या या कठीण काळात ऐक्य व शांतीसाठी वचनबद्दता या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या मैत्री मेळावा व परिसंवादासाठी सर्वधर्मीय व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यात आचार्य गुरुजी नागरहळी, (हिंदू) बोळींज, मौलाना सुभाण जी (इस्लाम),मूर्ताजा भाई अमिल साब (बोरा समुदाय), मनिनदर सिंघ कोहली (शीख समुदाय), श्रीमती वैशाली जोशी, शिक्षक (स्वाध्याय परिवार), भारती ताई (ब्रम्हकुमारी), माजी आम.डॉमिनिक घोन्सालवीस प्रा. गुणवंत गडबडे (बौद्ध परिवार), प्राचार्य डॉ. सोमनाथ विभूते उपस्थित होते.
किंबहुना कोरोंनापासून संपूर्ण जगाचे संरक्षण व्हावे, जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करत उपस्थितांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.