जिल्ह्यात 717 पैकी केवळ 240 शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:05 AM2021-01-06T00:05:37+5:302021-01-06T00:06:07+5:30
पहिल्या दिवशी फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती : पालक-विद्यार्थ्यांमध्ये अद्याप कोरोना संसर्गाची भीती
- हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २२ मार्चपासून बंद असलेल्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ७१७ शाळांपैकी केवळ २४० शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात ९ ते १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ५५५ विद्यार्थी म्हणजेच फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती नोंदविल्याने अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची जोखीम उचलण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळा सोमवारपासून अखेर सुरू होत ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. शाळा चालू होणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगली बाब असल्याने प्रत्येकाने स्वतःची स्वत:च काळजी घ्यायला हवी. शाळा सुरू झाल्यामुळे एक चांगले वातावरण तयार होईल व याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे काही शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यात इच्छुक नसल्याचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असले तरी नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण राज्यात सापडले आहेत. पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यात नव्या स्ट्रेनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मीरा-भाईंदरमध्येही एक रुग्ण सापडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ हजार ५५५ विद्यार्थ्यांनीच शाळेत आपली उपस्थिती नोंदविल्याने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.
शिक्षक-कर्मचारीही आढळले होते बाधित
जिल्ह्यात ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या ७१२ शाळा असून १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९ हजार ३९३ शिक्षकांपैकी ३ हजार ३१३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ शिक्षक बाधित आढळले, तर १ हजार २४७ शिक्षकेतर कर्मचारी असून त्यापैकी १३९ जणांची चाचणी करण्यात आली असता एक जण बाधित आढळून आला होता.