मासेमारीच्या परवानगीबाबत जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:28 AM2020-04-27T02:28:39+5:302020-04-27T02:28:47+5:30
२० एप्रिलला काढण्यात आलेले आदेश मागे घ्यावेत, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे.
हितेन नाईक
पालघर : आदर्श कार्यप्रणालीच्या गोंडस नावाखाली ४३ जाचक अटींसह मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी मासेमारीला घाईघाईने परवानगी दिल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मासेमारी केंद्रावर आरोग्यतपासणी केंद्रासह अन्य कुठल्याही तत्सम उपाययोजना आखल्या नसताना ट्रॉलर्सधारकांच्या फायद्यासाठी मासेमारी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत २० एप्रिलला काढण्यात आलेले आदेश मागे घ्यावेत, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे.
समुद्रात अंडीधारी माशांसह पापलेटच्या लहान पिलांची बेसुमार मासेमारी रोखून मत्स्योत्पादन वाढावे, यासाठी पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील बहुतांशी मच्छीमारांनी ३१ मेपर्यंत मासेमारीला न जाण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता मासेमारी सुरू केल्यास अंडीधारी मासे आणि लहान पिलांची मोठ्या प्रमाणात कत्तल (मासेमारी) होण्याची भीती आहेत. परिणामी, मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल, तर दुसरीकडे समुद्रात मासेमारीसाठी गेलो तर पकडण्यात येणारे मासे खरेदी करण्यासाठी निर्यातदार व्यापारी इच्छुक नसल्याची माहिती सहकारी संस्थांकडून दिली जात आहे.
मासे खरेदी-विक्रीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेले मुंबईतील क्रॉफर्ड मा$र्केट, भाऊचा धक्का आदी भाग कोरोनाच्या संसर्गाने रेड झोनमध्ये मोडत असल्याने सध्या बंद आहे. त्याच बरोबरीने नायगाव, सातपाटी, वसई, उत्तन येथील खरेदी-विक्रीच्या बाजारपेठाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करून आणलेल्या हजारो टन माशांची खरेदी-विक्री करण्याची कुठलीही व्यवस्था शासनपातळीवरून केली नसल्याने मासेमारी न करणे, हे सर्वांच्या हिताचे असल्याचे मत परंपरागत मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाधितांची तसेच मृतांची आकडेवारी वाढत असताना आणि खरेदी-विक्रीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने मासेमारीसाठी घाईघाईने परवानगीचे आदेश काढण्याचा हेतू काय? असा प्रश्न तांडेल यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात सातपाटी, मुरबे, डहाणू, वडराई, दांडी, नवापूर, वसई, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव या प्रमुख बंदरांतून मच्छीमारी बोटींना ४३ शर्ती-अटींची पूर्तता केल्यानंतरच मासेमारीला जाण्याची परवानगी देता येईल, असे नमूद केले आहे. संबंधित जिल्हाधिकारी व सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रत्येक बंदरात आरोग्यतपासणी केंद्र उभारावे, मासेमारी नौका बंदरावर अथवा जेट्टीवर नांगरताना नौकेवरील खलाशांनी आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्राशी संपर्क साधावा, आरोग्य विभागाकडून पूर्णत: तपासणी आणि थर्मल स्कॅनिंग झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरीय नियंत्रण विभागाच्या परवानगीनंतर खलाशांना बंदरात उतरण्यास व मासेमारीस परवानगी देण्यात येणार आहे.
>मासेमारी केंद्रांवर कोणतीही व्यवस्था नाही : मासेमारीपूर्वी ४३ अटींची पूर्तता केल्यानंतरच मासेमारी करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आदेशात म्हटले असताना जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई व ठाणे जिल्ह्यातील उत्तन या महत्त्वपूर्ण मासेमारी केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून एकही व्यवस्था उभी केली नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.