पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात, धुणी, भांडी अन् शौचासाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:08 AM2017-10-23T03:08:14+5:302017-10-23T03:08:18+5:30
वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
शशी करपे
वसई : वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पापडखिंड धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी दिवसाढवळ््या कपडे धुणे, गाई-म्हशी धुणे, पोहणे, धार्मिक विधी व निर्माल्य टाकण्याचे प्रकार होत असल्याने धरणातील पाणी दुषित झाले आहे. आता तर महापालिनेच या धरणात छटपूजेसाठी तयारी केली असल्याने संताप व्यक्त करण्यात येतो.
विरार शहरात ग्रामपंचायतीच्या काळात पाण्याची सोय व्हावी यासाठी एक एमएलडी क्षमता असलेले पापडखिंड धरण लोकसहभागातून बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी विरार पूर्वेकडील काही परिसरात पिण्यासाठी वितरित केले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने धरणातील पाणी दुषित बनत चालले असून सुरक्षाही धोक्यात आली आहे.
धरणाचा परिसर झोपडपट्टी आणि चाळींनी व्यापून गेलेला आहे. याठिकाणचे लोक धरणाचा वापर कपडे धुणे, गाई-म्हशी धुणे, आंघोळ करणे, धार्मिक विधी निर्माल्य टाकण्यासाठी करू लागले आहेत. आता तर धरणातील पाण्यात दुचाकी आणि चार चाकी वाहने धुणाºयांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येथील लोक धरणाच्या परिसरात सकाळी लवकर आणि रात्री उशिरा प्रात:विधी करू लागले आहेत. परिणामी धरणातील पाणी दुषित बनले आहे. आणि हेच पाणी महापालिका पिण्यासाठी लोकांना पुरवत आहे. दुसरीकडे, धरणावर सुरक्षा रक्षक नसल्याने मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी याठिकाणी आपले बस्तान बसवले आहे. दररोज दारुच्या मोठ्या पार्ट्या होत असल्याने सर्वसामान्यांना त्यांचा उपद्रव होऊ लागला आहे. हे कमी म्हणून की काय बंदी असतानाही धरणाच्या परिसरात खुलेआम ड्रोन कॅमेºयाचा वापर करून शुटींग आणि फोटोग्राफी केली जाताना दिसत आहे. धरणात बुडून अनेक लोकांचे जीव जाऊ लागले आहे. तर अनेक जण आत्महत्येसाठी या धरणाचा वापर करू लागले आहेत. १९ आॅक्टोबरच्या सकाळी धरणात एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी सदर इसमाचा दोन दिवसांपूर्वीपासून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. धरणावर सुरक्षा रक्षकच नसल्याने असे प्रकार घडत असल्याकडे माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, पाणी दुषित होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेली महापालिका पाणी दुषित होणाºया कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचेही आता उजेडात आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून धरणात छटपूजा केली जात असल्याने वादंग उठत आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत यंदा महापालिकेने धरणाच्या पाण्यात छटपूजा व्हावी यासाठी स्वत: तयारी करू लागली आहे.
दरम्यान, पापडखिंड धरणात गुरुवारी एक मृतदेह आढळून आल्यानंतर महापालिकेने या धरणातून पिण्यासाठी केला जाणारा पाणी पुरवठा तूर्तास बंद केला आहे. धरणातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यावरच पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तर धरणावर संरक्षणासाठी तीन पाळ््यांमध्ये सहा सुरक्षा रक्षक तैनात केले असतानाही तलावात गैरप्रकार होत असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात येतो.
>वादाची शक्यता...
महापालिकेचे सफाई कर्मचारी धरणावर छटपूजेसाठी सफाई करू लागले आहेत. त्यावेळी पाय घसरून कुणी पाण्यात पडू नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी धरणाच्या आतून पाण्यात उतरण्यासाठी पायºया करू लागले आहेत. त्यामुळे विरारमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार हे निश्चित मानले जाते.