भाताचे पीक दिले शेतकऱ्याने पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:51 PM2018-10-15T23:51:21+5:302018-10-15T23:51:54+5:30
वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे ...
वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न केल्याच्या निषेधार्थ संतापून त्यांनी हे पीक पेटवून दिल्याची घटना घडली.
वाडा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता त्यामुळे पेरणी व भातलागवडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही चांगली बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या परतीचा पावसाने दडी मारल्याने दाणा परिपक्व झाला नाही. पिके लाल पडून करपून गेली. जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे सोडा पेंढा सुद्धा हाताला लागला नाही त्यामुळे त्यांनी नैराश्यापायी आपले भातपीक कृषी साहाय्यक रंजना भोईर यांच्या समोरच पेटवून देऊन संताप व्यक्त केला. या गावातील वसंत गणपत मोकाशी, योगेश मोकाशी, विनायक मोकाशी, कृष्णा मोकाशी, तुकाराम मोकाशी, विजय मोकाशी, मंगूलाल मोकाशी, नारायण लहू मोकाशी,दीपक मोकाशी, गजानन मोकाशी, दत्तत्रेय मोकाशी, गणपत श्रीपाद मोकाशी, शंकर काळुराम मोकाशी या शेतकºयाच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातीलच ५० ते ६० टक्क्यांच्या वर भातशेतीचे नुकसान झाले.
वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी भातशेतीवर आवलंबुन आहेत.
अद्याप दुष्काळ घोषित नाही
तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून विविध गावांतील शेतकºयांनी महसूल व कृषी विभागाने शेतीचे पंचनामे करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा,अशी मागणीे केली आहे.नायब तहसिलदार गोसावींशी संपर्क साधला असता शासनाकडून आदेश नसल्याचे सांगितले.
हे शेतकरी विविध सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांचे तसेच सावकारी कर्ज घेऊन शेती करीत असतात. महागडी खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च, तसेच निसर्गाचा लहरीपणा या सर्व बाबींमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यात सरकारचेही दुर्लक्ष होते आहे.