चांगल्या पावसामुळे भातशेती बहरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:02 AM2017-08-14T03:02:39+5:302017-08-14T03:02:42+5:30

यंदा पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडल्याने या तालुक्यातील भातशेती चांगलीच बहरली आहे.

Paddy cultivates due to good rains | चांगल्या पावसामुळे भातशेती बहरतेय

चांगल्या पावसामुळे भातशेती बहरतेय

Next

राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : यंदा पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडल्याने या तालुक्यातील भातशेती चांगलीच बहरली आहे. गेल्या दोन चार वर्षापासून होत असलेल्या अनियमित पावसामुळे येथील शेतक-यांना भातपिकाचे उत्पादन घेणे जिकरीचे होत होते. परंतु यंदा मात्र विक्रमगड तालुक्यात भातशेतीसाठी आवश्यक असा पाउस झाल्याने व होत असल्याने सर्वत्र शेती हिरव्यागार भातरोपांनी बहरुन गेली आहे़ गेले काही दिवस उसंत घेणारा वरुण राजा श्रावणामध्ये देखील अधून मधून पावसाच्या सरी व उबदार उन देत आहे, जास्त पाउस नाही व जास्त उघडीप देखील नाही जणूकाही उन-पावसाचा खेळच चालू असल्यासारखे वातावरण सध्या अनुभवास मिळत आहे़ ते भातशेतीला अत्यंत पोषक ठरते आहे कारण यापुढे काही दिवसांत भाताला पोटरी येउन कणसे तयार होण्याचा काळ सुरु होणार आहे़ सध्या भातशेतीचा कालावधी हा पोटरीचा आहे़ भाताच्ंया रोपांना फुले येत आहेत़ या वातावरणामुळे सध्या भातशेतीबरोबरच तूर, माळरानावरील चिबुड, टोपलीतील डांगर, गावरान काकडी, परसातील भाजीपाला या दुय्यम पिकांनाही चांगला बहर आला आहे़ त्यामुळे सध्या बाजारात गावठी काकडी, शिरोळी, कंटोली, मका, वांगी, भेंंडी आदी भाजीपाला विक्रीस येत आहे़
विकमगड तालुक्यात एकूण ८६ गावपाडयांत ७५५७ हेक्टर क्षेत्रामध्ये मोठया स्वरुपात भात पिक घेतले जाते़ त्यासाठी सुधारीत भात वाणांमध्ये अती हळव्या गटात कर्जत -१८४, रत्नागीरी-२४, हळव्या गटात रत्ना, रत्नागीरी-1, रत्नागीरी-७११, कर्जत-३, कर्जत-४, कर्जत-७, एमटीयू-१०१०, रत्नागीरी-५, निमगरवा गट- जया, पालघर-१, कर्जत-५ एमटीयू-१००१, कर्जत-६, एचएमटीसोना, पुसा बासमती-१, इंद्रायणी,गरवा गट कर्जत-२, कर्जत-८, सुवर्णा(एमटीयू-७०२९),मसूरी, सांबा मसूरी (बीपीटी-५२०४), श्रीराम, संकरीत वाण पूसा आरएच-१०, संकरित मंगला, संकरित कल्याणी, संकरित सहयाद्री-२,३,४, याप्रमाणे सुधारीत भात बियाणांची लागवड शेतक-यांनी केली आहे़ वातारण स्वच्छ असल्याने भातशेती बहरली आहे़
दरम्यान या भागात निंदणीच्या (बेणणी) कामांनी चांगला वेग धरला आहे़ बहर आलेली पिके पाहून बळीराजा आनंदला आहे़ याबाबत ओंदे येथील शेतकरी बबन दामोदर पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगीतले की, असेच पोषक वातावरण किमान अनंत चतुर्दशी पर्यंत राहिल्यास मोठे नगदी पीक हाती लागण्याची शक्यता आहे. पावसाने अधिक उघडीप दिल्यास हळवे पिक हातातून जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली़ आतापर्यंत विक्रमगड सर्कल २३६४ मि़ मी. तर तलवाडा सर्कल २२४३ मि़ मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Paddy cultivates due to good rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.