वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:44 PM2020-11-11T23:44:30+5:302020-11-11T23:44:37+5:30

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Paddy cultivation completed in Vasai taluka | वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

googlenewsNext

विरार : पालघर जिल्ह्यात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने माेठ्या प्रमाणावर भातपीक वाया गेले. वसई तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा जबरदस्त फटका बसला हाेता. शेतीवर केलेला खर्च असा डाेळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत आसू उभे राहिले. मात्र, खाचरात पाणी साचून राहिल्याने जे तयार पीक उरले हाेते, त्याची कापणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीच्या तडाख्यानंतर जे भातपीक वाचले आहे, ते त्याची कापणी आणि झोडणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेला ससुनवघर, बापाणे, जूचंद्र, मालजीपाडा तसेच वसई पूर्वेतील कामण-चिंचोटी परिसर तसेच विरार पूर्वेतील सकवार, भारोळ, चंदनसारपर्यंतचा परिसर भातशेती लागवड करणारा मोठा ग्रामीण परिसर आहे.

दरवर्षी मान्सून पर्जन्यावर कसली जाणारी येथील भातशेती स्थानिक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. काही वर्षांपासून पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, ऐन भातकापणीच्या हंगामात अवकाळीचा तडाखा अशा लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांना या परिस्थितीला ताेंड द्यावे लागले. हजाराे हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली. त्यातूनही वाचलेले भातपीक कापून त्यांचे भारे शेतकऱ्यांनी खळ्यात आणून झोडणीला वेग दिला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाती  खर्चही लागणार नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्‍न उपस्थित हाेत आहे. नुकसानीचे शासनाने पंचनामे करूनही अद्याप त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.  

Web Title: Paddy cultivation completed in Vasai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.