पाइपलाइनमुळे भातशेती पडणार ओस
By admin | Published: July 7, 2017 05:42 AM2017-07-07T05:42:47+5:302017-07-07T05:42:47+5:30
घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पलीकडच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाल्याने शेती ओस राहणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबतचे निवेदन वाड्याच्या प्रांतअधिका-यांना देण्यात आले असून न्यायाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घोणसई या गावाच्या हद्दीतून गॅस पाईपलाईन जात असून कंपनीने गेल्या एप्रिल महिन्यात चर खोदले आहेत. त्या चराशेजारीच पाइप ठेवले आहेत. मात्र ते पाइप चरात अद्याप टाकलेले नाहीत. या चरामुळे शेतकऱ्यांचा पलीकडच्या शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने काही शेतात प्रचंड पाणी तर काही शेतात पाण्याचा थेंबही राहणार नसल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
भात लागवडीची कामे सुरू केली आहेत.
मात्र शेतावर जायला रस्ताच नसल्याने ती करता येत नाही. रिलायन्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची शेती ओस राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निवेदनात शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही गरीब शेतकरी असून शेतीशिवाय आमचे उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आमच्या वर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती निवेदनात नमूद केली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे. त्यावर पांडुरंग पाटील, अशोक घोरकणे, प्रकाश पाटील, अंकुश घोरकणे या शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. यासंदर्भात रिलायन्स गॅस कंपनीचे अधिकारी बाला सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधला असता एक दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.