भाताची कापणी मजुरांअभावी खोळंबणार
By admin | Published: October 28, 2015 12:44 AM2015-10-28T00:44:17+5:302015-10-28T00:44:17+5:30
कमी तसेच अनियमीतपणे पडलेल्या पावसानंतरही भातपीकांनी शेतजमीन फुलून गेली असून तयार झालेल्या भातपीकांची कापणी मजुराविना खोळंबण्याची शक्यता आहे.
बोईसर : कमी तसेच अनियमीतपणे पडलेल्या पावसानंतरही भातपीकांनी शेतजमीन फुलून गेली असून तयार झालेल्या भातपीकांची कापणी मजुराविना खोळंबण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तयार होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची चिंता वाढवित आहे.
पालघर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ११७८२४ हेक्टर असून त्यापैकी सुमारे १६ हजार २२२.८४ हेक्टर क्षेत्रफळावर भातलागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ८ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रफळावर हळवे, २ हजार ४९ हेक्टर क्षेत्रफळावर गरवे तर ४ हजार १५२ हेक्टर क्षेत्रफळावर निमगरवे भाताचे पीक घेण्यात आले आहे. जून महिन्यात पावसाने दमदार आगमन केल्यानंतर प्रथम भात बी पेरणी खोळंबली.
त्यानंतर पावसाच्या दिर्घ विश्रांतीमुळे भातपीकांच्या कामाची गणीतेच कोलमडून पडली. त्या ही परिस्थितीत शेतकऱ्यांनी
निसर्गाच्या लहरीपणावर मात करून भातपीकांना जोमाने वाढवून शेतजमीन फुलविली.
परंपरागत कामे करणारे शेतमजूर व जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी इ. भागातून येणारे मजूरांवर भातपीकांची कापणी ही प्रामुख्याने अवलंबून असते. परंतु स्थानिक शेतमजूरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या तसेच दुर्गम भागातूनही मजूर पुरेशा संख्येने
पालघर तालुक्यात येत नसल्याने शेतमजूरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
दुर्गम भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी परतीच्या प्रवासाला लागत असल्याने आता जे उपलब्ध होतील त्यांची मनधरणी करून लवकरात लवकर भातकापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. (वार्ताहर)
यंदा पावसाची ओढ, भातपिकावरील रोग यामुळे पिकांची उगवणी लांबणीवर पडली असली तरी परतीच्या पावसाने भातपिके थोडीफार तरारली. उंची कमी असल्याने यंदा गवत-पावोलीचा उतारा कमी मिळेल, असे सुभाष देसले यांचे म्हणणे आहे. बळीराजाने भातझोडणीला सुरुवात केली आहे. आॅक्टोबर हीट वाढली तरी पाऊस येण्याची शक्यता असून कापलेल्या भाताच्या उडव्यावर प्लॅस्टिक अंथरले जात आहे.
भातकापणीस जर उशीर झाला तर दिवसभरातील कडक उन्हामुळे भातामधील तांदळाचा दाणा टणक बनून दाणा तुटण्याची शक्यता अधिक असल्याने ठराविक वेळेत भातकापणी झाली नाही तर शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.