वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:57 AM2020-12-12T00:57:39+5:302020-12-12T00:58:23+5:30

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

Paddy shopping in the castle, bojwara | वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

Next

वाडा : तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांना भात विकू लागल्याने व्यापाऱ्यांचं मात्र चांगभलं होत आहे.

आदिवासी विकास महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या व सेवा सहकारी संस्थेमार्फत भातखरेदी केंद्र चालविली जात असत. मात्र, आता सेवा सहकारी संस्थेकडची केंद्र बंद करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांची पोशेरी, खानिवली, परळी, कळंभा, गारगांव, खैरे-आंबिवली या ठिकाणची केंद्रे सुरू आहेत, परंतु या भातखरेदी केंद्र चालकांकडून भात भरण्यासाठी लागणारी पोती शेतकऱ्यांना जुनी देऊन केंद्र चालक नवीन पोत्यांचे पैसे घेतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

तालुक्यातील बहुसंख्य केंद्र चालकांनी मोटार बसविल्याने तेथे भाताच्या दाण्यांचा तुकडा पडतो. त्यामुळे तो भात घेतला जात नाही व केंद्रावर आणलेले भात शेतकरी पुन्हा परत घेऊन घरी जाऊ शकत नाही. याच संधीचा फायदा हे केंद्र चालक अगदी कमी दराने शेतकऱ्यांकडून खासगीत भातखरेदी करतात. काही केंद्र चालक मापात फसवणूक करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातखरेदी केंद्रांवर शासनाचे नियम धाब्यावर बसवून भाताची प्रतवारी ठरविली जात असल्याने तालुक्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भातपिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीतजास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने अनेक शेतकऱ्यांचा भात विक्री झालेला नाही. तालुक्यातील महसुली गावांची संख्या १५० हून अधिक असताना ठरावीक भातखरेदी केंद्र सुरू केल्याने, या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागते, शिवाय आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांच्या नावावर गोडावूनधारकच ही केंद्र चालवत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला  नाही. 

आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ही योग्य आहे, परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आदिवासी सेवा सहकारी संस्थेमार्फत चालू असलेली भातखरेदी ही शेतकऱ्यांना मारक आहे.
- कांतीलाल म्हसकर
भात उत्पादक शेतकरी, सोनाळे 

या संदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विजय पवार यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Paddy shopping in the castle, bojwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.