घरात घुसून माय-लेकीला संपवलं, बाथरुममध्ये लपला अन्...; पालघर तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:41 PM2024-09-05T13:41:40+5:302024-09-05T13:52:00+5:30
पालघरमध्ये आठवड्याभरापूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उलघडलं आहे.
Palgahr Crime : आठवड्याभरापूर्वी पालघरच्या वाडा तालुक्यात एकाच घरात तीन मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आई-वडील आणि मुलगी असे तिघांचे मृतदेह बंद घरात सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. कामानिमित्त गुजरातला राहणाऱ्या मुलाने घरी जाऊन दरवाजा उघडून पाहिला असता हा सगळा प्रकार समोर आला. मुलाने वाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला होता. आता या प्रकणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
वाडा तालुक्यातील नेहरोली गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. गावात राहाणाऱ्या राठोड कुटुंबातील तिघांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आले होते. मुकुंद राठोड हे २५ वर्षांपूर्वी गुजरातमधून पालघर येथे राहण्यासाठी आले होते. मुकुंद यांच्या बरोबर त्यांची पत्ना कांचन राठोड, मुलगी संगित राठोड, दोन मुले सुहास आणि पंकज राहात होते. काही वर्षापूर्वी मोठा मुलगा सुहास राठोड हा नोकरी व्यवसायासाठी गुजरातमध्ये गेला. तर दुसरा मुलगा विरारमध्ये राहात होता.
कामानिमित्त दोन्ही मुले बाहेर असली तरी ते नेहमी फोनवरुन मुंकद राठोड यांच्याशी बोलत असत. मात्र १३ दिवसांपासून सुहासचा आई वडिलांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याने नेहरोली जाण्याचे ठरवलं. सुहास गावात पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा हा बंद होता. त्याने दरवाजा उघडला असता त्याला घरातून दुर्गंधी येऊ लागली. सुहासला घरात तिघांचेही मृतदेह पाहून जबर धक्का बसला. सुहासने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरु केला. मात्र तिघांचे मृतदेह पाहून पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी घराची छाडाछडती घेत असताना घरातील पत्र्याच्या पेटीत आई व मुलीचा मृतदेह आढळला. तर वडिलांचा मृतदेह बाथरुमच्या दरवाज्यात आढळला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. तपासादरम्यान भाडोत्रीने तिघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.
मुकुंद राठोड यांनी गावात एक जागा घेऊन इमारत बांधली होती. त्या इमारतीत त्यांनी भाडेकरुंनाही जागा दिली होती. याच इमारतीत आरिफ हा भाडेकरु म्हणून राहत होता. आरिफ हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. राठोड यांच्याकडे भरपूर पैसे असतील असं आरिफला वाटत होतं. त्यामुळे त्याने राठोड यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलीची लोखंडी रॉडने त्यांची हत्या केली. त्यानंतर पत्र्याच्या बंद पेटीत त्यांचे मृतदेह ठेवले. हा प्रकार घडला तेव्हा मुकुंद राठोड हे घराबाहेर होते. त्यामुळे आरोपी आरिफ घरात बाथरुममध्ये लपून बसून त्यांची वाट पाहत होता. राठोड घरात येताच त्याने बाथरुममधून त्यांच्यावर वार केले. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी आरिफ उत्तर प्रदेशला पळून गेला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके रवाना केली होती. उत्तर प्रदेशातून पोलिसांनी आरोपी आरिफला अटक करण्यात आली.