पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:40 AM2021-05-03T00:40:16+5:302021-05-03T00:40:29+5:30
वाढत्या रुग्णसंख्येत समाधानाची बाब : आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न
पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, अनेक रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. याचवेळी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असून, योग्य ती काळजी घेतल्यास तसेच सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करता येते, हाच संदेश या आजारातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजवर ६८ हजार २६० रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.
पालघरच्या ग्रामीण भागात यावेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य खात्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रविवारी डहाणू तालुका ८४, जव्हार ३२, मोखाडा २३, पालघर ४९४, तलासरी ५ आणि विक्रमगड ५ असे ग्रामीण परिसरात नवीन रुग्ण आढळले. वसई ग्रामीण आणि वाडा तालुक्यांमध्ये मात्र रविवारी नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या पालघरच्या ग्रामीण भागात डहाणू तालुका १ हजार ९२, जव्हार ६१४, मोखाडा ३५१, पालघर ४ हजार २१९, तलासरी ४०९, वसई ग्रामीण १३४ विक्रमगड २२२ तर वाडा तालुक्यात ४०५ रुग्ण उपचार घेत आहेत.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर ३३ हजार ९५० रुग्ण कोरोनामुळे बाधित आढळले आहेत. मात्र, यातून तब्बल २६ हजार रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर सध्या ७ हजार ४४६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.
वसईकरांनाही दिलासा
वसई-विरार क्षेत्रामध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिका हद्दीत आजवर ५४ हजारपेक्षा अधिक लोक बाधित आढळले आहेत, मात्र त्याचवेळी तेथेही कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वसई-विरारमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.