पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:39 AM2019-02-04T06:39:55+5:302019-02-04T06:40:14+5:30
जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत.
पालघर - जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत रहिवाशांशी संवाद साधला. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.
कुर्झे धरण, अणुऊर्जा प्रकल्प यांना धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. तंबू बसविलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी शनिवारी रहिवाशांशी संवाद साधला आणि प्रशासन त्यांच्यासोबत असल्याचा दिलासा दिला.
नाशिक येथील धरण सुरक्षा मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला सविस्तर पाहणीसाठी बोलावण्यात आले आहे. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचे डिझाईन देखील भूकंपरोधक असल्याने त्या प्रकल्पाला देखील कोणताही धोका संभवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
एनडीआरएफची तुकडी शनिवारी या भागात दाखल झाली असून रहिवाशांच्या निवाºयासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून संबंधित गावांमध्ये २०० तंबू उभारण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७० ते ८० जण एकत्रित राहू शकतील, असे मोठे तंबू उभारण्यात आले आहेत. तीन रूग्णवाहिकांसह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून पोलीस रात्रीची गस्तही घालत आहे.
सोय गावासाठी, क्षमता कुटुंबाची
डहाणू, तलासरी तालुक्यातील काही गावांना तीन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने सुरक्षेची उपाययोजना म्हणून शासनाने धुंदलवाडी, दापचारी येथे प्रत्येक पाड्यात १० बाय १२ चे तंबू ठोकून जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
या तंबूत कुटुंबातील केवळ सात ते आठ सदस्य राहू शकत असल्याची प्रतिक्रि या धुंदलवाडीच्या ग्रामस्थांनी दिली आहे.
भूकंप पीडित मदतीच्या प्रतीक्षेत
शुक्रवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने मुंबई अहमदाबाद हायवे लगत असलेल्या हळद पाडा, खिवरपाडा येथे भयभीत होऊन पळत असताना वैभवी रमेश भूयाल या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पण दोन दिवसानंतरही आमच्या घराकडे शासकीय यंत्रणा फिरकलेली नाही तसेच कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले.