पालघर विधानसभा मतदारसंघ राकाँला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:45 PM2018-10-23T23:45:26+5:302018-10-23T23:45:29+5:30
येत्या निवडणुकीच्या जागा वाटपात पालघर विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडून खेचून घेण्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही झाली
पालघर : येत्या निवडणुकीच्या जागा वाटपात पालघर विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडून खेचून घेण्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही झाली असून कुठल्याही परिस्थितीत ही जागा लढविण्याचे पालघरमध्ये झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
पालघर तालुका राष्ट्रवादी कॉगेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा रविवारी बंधन रिसॉर्ट, अल्याळी येथे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील, महिला आघाडी अध्यक्ष निलम राऊत, शहराध्यक्ष विरेंद्र पाटील, विरोधी पक्ष नेता मकरंद पाटील, युवक अध्यक्ष रोहन पाटील - अध्यक्ष पालघर जिल्हा युवक, नगरसेवक प्रितम राऊत आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पालघर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पालघर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचा उमेदवाराने लढवण्याची इच्छा व्यक्त करून शरद पवारांकडे तशी मागणीही केल्याचे आमदार आनंद ठाकूर यांनी सांगितले. प्रदेश राष्ट्रवादीच्या मार्गदर्शना नुसार प्रत्येक गावोगावी बूथ कमिटी तयार करून कार्यकर्त्याच्या नेमणूका करीत पक्ष बांधणीवर तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी भर दिला आहे.
>पालिकेतही सत्ता येईल
पालघरात काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता २०१९ च्या निवडणुकीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात पालघर मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळायला हवा असा कार्यकर्त्यांचा आग्रह ही वाढू लागल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी नमूद केले.
पालघर नगरपरिषदेवरील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकल्याने या निवडणुकीत नागरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असेल असा आशावाद जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी व्यक्त केला.