पालघरला विधानसभेची गणिते बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:38 AM2019-05-27T00:38:46+5:302019-05-27T00:38:51+5:30
पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांनी बविआच्या बळीराम जाधव यांचा ८८ हजार ५९८ मतांनी पराभव केला आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : अगदी उमेदवार निवड ते चिन्ह वाटप आणि पक्ष बदल इथपर्यंत अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांनी बविआच्या बळीराम जाधव यांचा ८८ हजार ५९८ मतांनी पराभव केला आहे. यामुळे पालघरवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून या लोकसभेच्या निवडणुकीने सहाही विधानसभा मतदारसंघाचे गणिते मात्र बदलली आहेत. बविआला त्यांच्याच बालेकिल्ल्यात सपाटून मार खावा लागला तर भाजपाचे आमदार असलेल्या डहाणू आणि विक्रमगड विधानसभेत मात्र आघाडीने मुसंडी मारली असून युतीला जोरदार झटका दिला आहे. मात्र या विधानसभानिहाय बदललेल्या गणितामुळे विधानसभेच्या चित्रात बदल पहावयास मिळेल हे नक्की. बविआची खरी मदार असलेल्या बोईसर नालासोपारा मतदरसंघात युतीने जोरदार मुसंडी मारली तर वसईमधूनही बविआला अपेक्षित आघाडी घेता आली नाही तर पालघरमते युतीने मोठे मताधिक्य मिळवले. महाआघाडीने युती पेक्षा ५ हजार ५५४ अधिक मते घेऊन आघाडी घेतली. कारण पोटनिवडणुकीत सीपीएम कॉंग्रेस बविआ आणि राष्ट्रवादी यांची मिळून मते ही सेना भाजप पेक्षा ६० ते ७० हजारांनी मागे होती. मात्र या निवडणुकीत जिथे युतीने चौफेर फटकेबाजी केली. मुळात विक्रमगड पूर्वीपारपासून भाजपाचा बालेकिल्ला असून सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री विष्णू सवरा यांचा मतदारसंघ आहे. यामुळे या मतदरसंघातून गाविताना आघाडी मिळणे आवश्यकच होते. मात्र इथे आघाडीने युतीला मागे टाकल्याचे दिसले. विक्र मगडमध्ये आघाडीने आपली ताकद वाढवून दाखवली आहे.
।महायुतीसाठी ही धोक्याची घंटा?
विक्रमगड विधानसभा हा आघाडीत तसा राष्ट्रवादीच्या वाटेला आहे. यामुळे या ठिकाणी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांचा होमटाउन असलेल्या या मतदारसंघात महाआघाडीच्या सर्वच नेते मंडळीने प्रचंड मेहनत घेतल्याचे यावेळी दिसून आले. त्यातूनच महाआघाडीच्या एवढ्या बिकट स्थितीतही आघाडीने इथे पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. एकूणच महाआघाडीची ही आघाडी युतीला विधानसभेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.