पालघरमध्ये औषधे खाऊन डास झाले गब्बर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:16 AM2020-03-16T00:16:51+5:302020-03-16T00:21:52+5:30

१ कोटी ३७ लाख ५४ हजार खर्च, तरीही शहरात डासांची संख्या दुपटीने वाढल्याचा आरोप

In Palghar city, the number of mosquitoes has doubled | पालघरमध्ये औषधे खाऊन डास झाले गब्बर!

पालघरमध्ये औषधे खाऊन डास झाले गब्बर!

Next

- हितेन नाईक
पालघर : पालघर नगरपरिषदेने मागच्या दोन वर्ष दोन महिन्यात डास निर्मूलनाच्या फवारणीवर तब्बल १ कोटी ३७ लाख ५४ हजाराचा खर्च केला असूनही या औषध फवारणीने डासांचे निर्मूलन होण्याऐवजी शहरात डासांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून डासांना मारण्याच्या औषधाची फवारणी केली जाते की वाढण्याच्या औषधांची फवारणी केली जाते? अशी चर्चा शहरात सुरू आहे. डासांची मोठी उत्पत्ती होत असतानाही ठेकेदाराला मुदतवाढ कशी मिळते? ठेकेदाराला नगरपरिषदेतून कोणाचा आशीर्वाद आहे? याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.
पालघर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात स्प्रे पंप तसेच धुरीकरण यंत्रणाद्वारे जंतुनाशक व कीटकनाशक फवारणी या कामासाठी २४ जानेवारी २०१८ पासून तीन वर्षांचा ठेका जागृती अ‍ॅग्रो इंटरप्राईजेसचे ठेकेदार रोशन संखे यांना प्रति महिना ५ लाख २९ हजार रुपयांचा ठेका देण्यात आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात काम करताना प्रत्येक वर्षी कामाच्या गुणवत्तेनुसार काम होते की नाही हे नगरपरिषदेच्या सभेत तपासले जाते. नंतरच या ठेक्याला पुढे मुदतवाढ देण्याचा अधिकार नगर परिषदेने राखून ठेवल्याचे ठेकेदाराशी करारनामा करताना दिलेल्या शर्ती-अटीमध्ये नमूद करण्यात आले आहे. असे असताना मागील २ वर्ष २ महिन्याच्या कालावधीत शहरातील डासांची संख्या कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी ठेकेदाराने वापरलेल्या औषधांचा, फवारणीचा काडीमात्र उपयोग होत नसताना या औषध फवारणीसाठी १ कोटी ३७ लाख ५४ हजाराचा खर्च करण्याची गरजच काय? असा प्रश्न कररूपी उत्पन्न देणारे हजारो पालघरवासी उपस्थित करीत आहेत. शहरात डासाची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्याचे पालघर शहरवासीयांच्या नगर परिषद तक्रारीत असूनही तत्काळ आवश्यकतेनुसार धुरीकरण तसेच प्रेम करण्याचे काम ठेकेदारावर बंधनकारक असतानाही धुरीकरण, फवारणी वेळेवर केली जात नसल्याचे पालघरवासीयांचे म्हणणे आहे. शहरात ज्या ज्या ठिकाणी डासांच्या अळ्या असतील, त्या ठिकाणाचे संशोधन करून डासांचा नायनाट करण्याकामी आवश्यकते-नुसार धुरीकरण तसेच फवारणी करणे ठेकेदारावर बंधनकारक असते. गटारे, नाला, सेप्टीक टँक, मोकळे भूखंड, नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारती इत्यादी ठिकाणी आवश्यकतेनुसार ही फवारणी करणे ठेकेदार म्हणून त्यांच्यावर बंधनकारक असल्याचे अटींमध्ये नमूद करूनही ठेकेदारांनी नेमलेले कर्मचारी या अटीचे पालन करत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ठेकेदाराला आखून दिलेल्या शर्ती-अटीचे पालन योग्य रीतीने केले जात नसल्याने व त्यांचे काम असमाधानकारक वाटल्यास व सूचना देऊनही कामात सुधारणा न झाल्यास ठेकेदाराचे काम रद्द करण्याचा अधिकार नगर परिषदेने राखून ठेवला आहे. अशा वेळी नगर परिषद आपल्या अधिकाराचा वापर का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असून टक्केवारीचे गणित तर आड येत नाही ना? अशी शंकाही शहरातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठेकेदार संखे यांना देण्यात आलेला ठेका तत्काळ रद्द करावा, अशी मागणी शहरातून केली जात आहे.
पालघर नगर परिषदेने आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० या चार महिन्यांमध्ये स्वच्छता सफाईसाठी
६६ लाख ९५ हजार, गटार सफाईसाठी २५ लाख ६१ हजार औषध फवारणीसाठी २० लाख ९८ हजार तर जंतुनाशके खरेदी करण्यासाठी ५ लाख १७ हजार निधी खर्च करण्यात
आलेला आहे.

प्रादुर्भाव रोखण्यात अपयश

कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश येत आहे. मर्जीतल्या ठेकेदाराचे पोट भरण्याचे काम नगर परिषद करीत नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात ठेकेदार रोशन संखे यांना कॉल करून, मोबाईलवर मेसेज टाकूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ठेकेदाराला सूचना देऊनही काम योग्यरीत्या होत नसल्याने येत्या सभेत हा विषय चर्चेला घेऊन ठेका रद्द करण्याबाबत निर्णय घेणार आहोत.
- उत्तम घरत, उपनगराध्यक्ष.

नगर परिषदेकडून फवारणी वेळेवर होतच नाही. रात्री १२ नंतर होत असेल तर कल्पना नाही, परंतु डास भयंकर वाढले असून चावल्यानंतर भयंकर वेदना होतात.
- अशोक चुरी, आदिवासी सेवक,
महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त.

Web Title: In Palghar city, the number of mosquitoes has doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.