पालघर, डहाणू, वसईला पाईपने गॅस
By Admin | Published: September 28, 2016 02:57 AM2016-09-28T02:57:31+5:302016-09-28T02:57:31+5:30
पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत आणि घरगुती वापरासाठी पाईप लाईन द्वारे गॅस पुरविण्याकरिता पालघर, डहाणू व वसई तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम
पालघर : पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत आणि घरगुती वापरासाठी पाईप लाईन द्वारे गॅस पुरविण्याकरिता पालघर, डहाणू व वसई तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने खासदार चिंतामण वनगा यांना पाठविले आहे.
जिल्हा लगत असलेल्या गुजरात राज्यात पाईपलाईनद्वारे एल.पी.जी.चा पुरवठा होत असल्याने पालघर जिल्हयातही तो व्हावा यासाठी दोन वर्षांपासून पालघरचे खासदार चिंतामण वनगा प्रयत्न करीत होते. १३ आॅगस्ट २०१५ रोजी लोकसभेत त्यांनी या विषयी प्रश्न उपस्थित करु न वसई विरार महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाईप लाइनद्वारे एल.पी.जी. गॅस वितरणाबाबत सद्य स्थिती काय व लवकरात लवकर गॅसचे वितरण सुरु व्हावे यासाठी सरकार द्वारे करण्यात आलेल्या उपाय योजनेबद्दलची सविस्तर माहिती मागितली होती.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वनगा यांना त्या संबधी सूचित केले असून जी.जी.एल. या कंपनीला पाइप लाइन द्वारे एल.पी.जी. गॅस पुरविण्यास अधिकृत करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तसेच एका पत्राद्वारे कंपनीने ‘गेल’ च्या तारापुर टर्मिनल मधून गॅस पुरविणे तथा पाईप लाईन टाकण्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले असल्याची माहिती दिली. याचा फायदा संपूर्ण पालघर, डहाणू व वसई तालुक्याला मिळणार असून या क्षेत्रात सी.एन.जी. स्टेशन्स उभारणीच्या संभाव्यतेची पडताळणी करण्याचे कामही सुरू असल्याचे खासदारांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या निर्णयामुळे औद्योगिक वसाहत आणि घरगुती वापरासाठी मोठी सोय होणार आहे. (प्रतिनिधी)