डीएडचे परीक्षा केंद्र पालघरला
By admin | Published: May 28, 2016 02:28 AM2016-05-28T02:28:10+5:302016-05-28T02:28:10+5:30
डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून
वसई : डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून मुळच्या ठिकाणीच परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थी डिएडची परीक्षा देणार आहेत. गेल अनेक वर्षांपासून ही परीक्षा
वसईतील पापडी येथील सेंट एलॉयशियस डिएड कॉलेजमध्ये होत असे. परंतु यावर्षी डिएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे ठेवण्यात आले आहे.
वसई तालुक्यातील तसेच भार्इंदरच्या विद्यार्थ्यांना पालघर येथे ये-जा करणे त्रासदायक आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वे गाडया मर्यादीत आहेत. ट्रेनच्या फेऱ्यासुद्धा खूप कमी आहेत. अलिकडे ट्रेन सर्विस बऱ्याच वेळा अनियमीत असते. शिवाय वसई खेडयापाडयातील विद्यार्थींनींना अप डाऊन करणे अत्यंत त्रासाचे आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे, त्यांचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्या परीक्षेचे केंद्र वसई येथील सेंट एलॉशियस डि.एड. कॉलेज येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष
वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मायकल फुटर्याडो यांनी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून परीक्षा केंद्र बदलाविषयी चौकशी केली असता ठाणे व पालघर येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र बदलाचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालकांनी सांगितलचे फुर्ट्याडो म्हणाले.
विद्यार्थ्यांना असणारा परीक्षेचा तणाव त्यातून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याची भिती, गाडयांच्या अनियमित फेऱ्या यांची कल्पना असूनही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य असलेला निर्णय घेणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी शिक्षण संचालकांकडे मागणी केली आहे.