पालघर डायरी : महिलांच्या डोक्यावरचे हंडे कधी दूर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:45 IST2025-03-17T10:45:26+5:302025-03-17T10:45:59+5:30

...राज्य शासनाच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी मात्र एकाही लोकप्रतिनिधीचा आवाज उठताना दिसत नाही.

Palghar Diary When will the pots on women's heads be removed | पालघर डायरी : महिलांच्या डोक्यावरचे हंडे कधी दूर होणार?

पालघर डायरी : महिलांच्या डोक्यावरचे हंडे कधी दूर होणार?

हितेन नाईक, पालघर समन्वयक

पालघर जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले असताना, वैतरणा नदीतील पाणी गोदावरी नदीवाटे मराठवाड्यात नेणार असल्याची घोषणा अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात वैतरणा नदी, तिच्या उपनद्या, धरणे यांच्या माध्यमातून मोठा जलसाठा असतानाही जिल्ह्यातल्या गरीब जनतेला मात्र तहानलेले ठेवून त्यांच्या हक्काचे पाणी पळविले जात आहे. राज्य शासनाच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी मात्र एकाही लोकप्रतिनिधीचा आवाज उठताना दिसत नाही.

पालघर जिल्ह्यातून वाहणारी वैतरणा ही मुख्य नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळील सह्याद्री पर्वतात उगम पावलेली आहे. पश्चिम वाहिनी असलेली ही नदी अरबी समुद्राला मिळते. तिच्या उपनद्या असलेल्या सूर्या, तानसा, पिंजाळ, सुसरी, देहर्जे या नद्याही पश्चिमेला वाहतात. सूर्या नदीवर धामणी हे एक महत्त्वपूर्ण धरण बांधण्यात आले आहे. जिल्ह्यात भातसा, पिंजाळ, देहर्जे, तानसा, बारवी यांसारख्या नद्यांवर कवडास उन्नयी बंधारा, वांद्री मध्यम प्रकल्प, मनोर लघुपाटबंधारे योजना, माहीम-केळवा लघुपाटबंधारे, देवखोप लघु पाटबंधारे, रायतळे लघु पाटबंधारे, खांड लघुपाटबंधारे, मोह-खुर्द लघुपाटबंधारे या योजनांद्वारे सुमारे ७८१.३२८ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रचंड पाणीसाठा साठवला जातो.

या धरण क्षेत्रात या वर्षी चांगला पाऊस पडल्याने पालघरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे मनोरच्या लघु पाटबंधारे विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, धरण आणि लघुपाटबंधारे क्षेत्रात असलेले पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि मुंबई या शहरी भागांकडे मोठ्या प्रमाणात वळविले जात असल्याने या भागाला पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही. दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धरणे आणि लघु पाटबंधारे निर्माण करण्यात आले आहेत, अशा मोखाडा, वाडा, जव्हार या तीन तालुक्यांतील नागरिकांना मात्र जानेवारीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तीन गावे आणि २० पाड्यांमध्ये टँकरच्या २६ फेऱ्यांद्वारे लोकांच्या घरात पाणी पोहोचविण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे. अनेक तालुक्यांतील दुर्गम भागात महिला आपल्या डोक्यावर हंडे घेऊन खाचखळग्याच्या वाटा तुडवीत कुटुंबीयांची तहान भागवत आहेत. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात सिंचनक्षमता वाढविण्याच्या नावाखाली १३२.४८ दशलक्ष घनफूट पाणी गोदावरीच्या उपखोऱ्यात वळविण्यात येणार आहे. अशा वेळी पालघर जिल्ह्यातील सिंचन क्षमता दिवसेंदिवस घटत असून ओसाड पडलेल्या या जमिनीला पाण्याची गरज उपलब्ध करून न देताजिल्ह्यातले पाणी इतरत्र वळविले जात असल्याने त्याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील सिंचन क्षमतेवर पडत आहे.
 

Web Title: Palghar Diary When will the pots on women's heads be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.