पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 04:15 AM2020-03-22T04:15:22+5:302020-03-22T04:15:37+5:30

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

In Palghar district, despite the abundant water resources, many villages are thirsty | पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

Next

- रवींंद्र साळवे

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असताना धामणी, शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे व गोळ्याचापाडा, नावळ्याचापाडा, दापटी -१, दापटी-२, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा, कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंडाचीवाडी ठाकुरपाडा पोऱ्याचा पाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशा २४ पाड्यासह एकूण ३१ गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
गेल्या वर्षी जवळपास याच कालावधीमध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती व नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गावपाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यंत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना, पण तालुक्यात पाणीटंचाईने डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने पाणीटंचाई समस्या कठीण होऊन बसणार आहे. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठमोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे. या धरणावर करोडोचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल- मे मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासीना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले आहेत.

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील पाणीटंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु लगतच्या गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते.

पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला, याचे उत्तर आजही प्रशासणाकडे नाही. कारण प्रातिनिधिक स्वरुपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचापाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला आहे.

ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, बंधारे, नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्च झाला आहे.

मोखाडा तालुका हा टंचाईग्रस्त तालुका असून दरवर्षीच टंचाईग्रस्त गावपाड्यांचा शंभरचा आकडा पार करावा लागतो. टँकरच्या नावाखाली दरवर्षी करोडोचा खर्च देखील होतो. यामुळे मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची गरज आहे. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

Web Title: In Palghar district, despite the abundant water resources, many villages are thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर