पालघर जिल्हा विकास आघाडी जि. प. निवडणुकीच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:45 AM2019-12-11T00:45:46+5:302019-12-11T00:45:50+5:30
सर्व जागा लढवणार : इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन
पालघर : विक्रमगड तालुक्यावर असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथून टाकण्यासाठी पालघर जिल्हा विकास आघाडी मैदानात उतरली आहे. नगरपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर विकास आघाडीच्या नीलेश सांबरे यांनी पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा आजही आरोग्य, कुपोषण, रोजगार, स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेणे आदी अनेक गोष्टीपासून वंचित राहिला आहे. त्याचप्रमाणे चांगले शिक्षण, शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्नही आजपर्यंत सुटलेले नाहीत. चांगल्या आरोग्य व्यवस्थेची उभारणी केली जात नसल्याने रुग्णांना गुजरात व सिल्वासा येथे उपचारासाठी जावे लागत आहे. योग्य उपचारांच्या अभावामुळे आजही माणसे किड्या-मुंग्यांप्रमाणे मृत्युमुखी पडत आहेत.
कुपोषणामुळे बालके दगावत आहेत. पालघर जिल्ह्यात शेतीच्या सिंचनासाठी बांधलेल्या धरणातील पाणी मुंबई, वसई, मीरा-भार्इंदर येथे नेले जात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अनेक विघातक प्रकल्प पालघर जिल्ह्यावर लादले जात असताना मूळ प्रकल्पग्रस्तांना मात्र योग्य मोबदला आणि त्यांचे योग्य पुनर्वसनही केले जात नाही. इच्छाशक्तीच्या अभावामुळे राजकीय पक्षांकडून जिल्ह्याचा विकास जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर आजही साधता आलेला नाही.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, क्र ीडा, ग्रामीण विकास अशा विविध विषयात जोमाने काम सुरू आहे. मात्र आता खºया अर्थाने जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सामाजिक जाणीव असलेले उच्चशिक्षित तरुण राजकारणात पाठवल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.म्हणूनच जिजाऊ संघटनेने ‘पालघर जिल्हा विकास आघाडी’ स्थापन करून येत्या पालघर जिल्हा परिषदेच्या आणि जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
तरुणांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले असून, उच्चशिक्षित, सामाजिक जाण व आवड असणाऱ्यांनी तरुण-तरुणी, महिला-पुरुषांनी १४ डिसेंबरपर्यंत आपल्या परिचय पत्रासह (बायोडाटा) झडपोली, विक्रमगड येथे संपर्कसाधण्याचे आवाहन केले
आहे.
‘स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पालघर जिल्ह्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती यासारख्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. कुठल्याही राजकीय पक्षाला या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही हे आता स्पष्ट झाले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आम्ही ही विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. जनतेच्या या लढ्याला नक्कीच यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.’
- नीलेश सांबरे, अध्यक्ष,पालघर जिल्हा विकास आघाडी, जिजाऊ संघटना, कोकण विकास मंच, सामाजिक कार्यकर्ते.