पालघर जिल्ह्याला हवी कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वतंत्र बाजारपेठ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:18 AM2020-01-20T01:18:26+5:302020-01-20T01:19:28+5:30
स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही.
विक्रमगड : स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांचे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे या परिसरात शेती करणाºया शेतकऱ्यांना शेतात पिकवलेला माल स्वत:च मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच वापी या शहरांमध्ये जाऊन विकावा लागतो. या शेतकºयांसाठी जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची सोय उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा तसेच इतर तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. परंतु आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी अशी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकºयांना आपला माल स्वत:च विकावा लागत आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच वापी येथील व्यापाºयांना हा माल द्यावा लागतो. परंतु या व्यापाºयांकडून त्यांना योग्य भाव मिळत नाही.
जिल्ह्यातील विक्रमगडसह इतर तालुक्यांमध्ये अनेक खेड्यापाड्यांत सध्या मोठ्या प्रमाणात गवार, चवळी, मुळा, भेंडी, मेथी अशा प्रकारचा भाजीपाला तयार होतो. हा भाजीपाल्यासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध नाही. या भागातील शेतकºयांच्या शेतात तयार होणारा भाजीपाला दररोज शेतकरी विक्रीसाठी घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांचा अर्धा-अधिक वेळ हा भाजीपाला विक्रीसाठी बाजारातच जातो. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळत नाही. या भागातील बहुतांश शेतकरी हे अशिक्षित, आदिवासी आहेत. त्यांना बाजारातील दलाल तसेच व्यापाºयांच्या ठकवणुकीला सामोरे जावे लागते. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन गेला की, त्याला तो माल परत नेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याला बाजारात तो माल खपवावाच लागतो. त्याची ही मजबुरी लक्षात घेऊन व्यापारी आणि दलाल भाव पाडून त्याच्याकडून माल खरेदी करतात. कष्ट करून, घाम गाळून आपल्या शेतात पिकवलेले सोने त्याला अशा रीतीने कवडीमोल भावाने विकावे लागते. मात्र परिस्थितीसमोर गांजलेल्या शेतकºयांना या परिस्थितीला शरण जाण्याशिवाय अन्य पर्याय नसतो.
जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला आमचा माल नाइलाजाने व्यापाºयांना द्यावा लागतो. आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यामुळे आमची फारच हैराणी होत आहे. भाव तोडून माल द्यावा लागत असल्याने तो परवडत नाही. यासाठी मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे माल देता येईल व भावही मिळेल.
- राजाराम ढोणे, शेतकरी, विक्रमगड