आरोपांच्या फैरीनंतर पालघरच्या तोफा थंड, उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:13 AM2018-05-27T06:13:03+5:302018-05-27T06:13:03+5:30
गेल्या ३ आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हा ढवळून काढणाऱ्या व देशाचे लक्ष वेधून घेणाºया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या भाजपा व सेनेच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावली.
पालघर - गेल्या ३ आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हा ढवळून काढणाऱ्या व देशाचे लक्ष वेधून घेणाºया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या भाजपा व सेनेच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रचाराची धुरा वाहिली. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि पालघरचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनीही या प्रचारात सूत्रधाराची भूमिका बजावली. शिवसेनेने पैैसे वाटणाºयांना पकडून व मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सीडी ऐकवून, प्रचाराच्या अंतिम चरणात जोरदार मुसंडी मारली, तर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी थातुरमातुर खुलासा करून सेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
गद्दारी, भेसळीचे रक्त, बेईमानी अशा शब्दांचा दोन्ही पक्षांनी भरपूर मारा केला. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या दामू शिंगडा व बविआचे बळीराम जाधव यांचा प्रचार फारसा जाणवलाच नाही. त्यामुळे हे दोघे लढतीत आहेत की नाही, असे मतदारांना वाटत होते, अशीच स्थिती डाव्यांची पण होती. सोशल मीडियाचा मोठा वापर या प्रचारात पाहायला मिळाला. दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची दारे आयारामांसाठी उघडी करून, मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. डाव्यांचे उमेदवार किरण गहला यांचा प्रचार फारसा जाणवलाच नाही.
श्रोतेच नाहीत
केंद्रीय नेतेही प्रचारासाठी कुणी आले नव्हते. आदित्यनाथ योगी, तसेच चंद्रकांत पाटील आणि राज पुरोहीत यांचा अपवाद वगळता, भाजपाचेही केंद्रीय नेते व महाराष्टÑातील मंत्री प्रचारात उतरले नाही. स्मृती ईराणी या डहाणूच्या सूनबाई म्हणून त्यांना खास प्रचारासाठी आणले, परंतु त्यांच्या सभेला श्रोतेच न जमल्याने त्यांच्या सभेचाही विशेष असा ठसा प्रचारात जाणवला नाही.
पैसे वाटणाºयांविरुद्ध
केवळ चॅप्टर केस दाखल
डहाणू : शिवसेनेने पैसे वाटतांना पकडलेल्या १२ जणांविरुद्ध पोलिसांनी केवळ चॅप्टर केस दाखल करून त्यांना सोडून दिले. त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्यांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या अनुमतीने गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
शह आणि काटशह
- शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची खेळी अचानक करून भाजपाला धोबीपछाड दिली. त्यामुळे खवळलेल्या भाजपाने काँग्रेसचा उमेदवार असलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन कमळाच्या दावणीला बांधले. त्यामुळे काँग्रेसही खवळली, परंतु सामग्रीअभावी तिचे हात बांधले गेले होते.
- वनगा यांच्या छायाचित्राचा वापर करण्यास भाजपाला मनाई करावी, अशी वनगा कुटुंबीयांची तक्रार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, यामुळेही प्रचाराची रंगत वाढली.
- नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी बविआचे हितेंद्र ठाकूर यांना ‘कुत्रा’ म्हटल्याने, या परिसरात संतापाची लाट उसळली. स्वत: ठाकूर यांनीही ‘कुत्रा इमानदार असतो. मी माझ्या मतदारांप्रती इमानदार आहे,’ असा टोला मुख्यमंत्र्यांना हाणला.