पालघर तीन महिन्यांत भारनियमनमुक्त करा
By admin | Published: December 7, 2015 12:42 AM2015-12-07T00:42:41+5:302015-12-07T00:42:41+5:30
जिल्ह्यातील एकही गाव यापुढे अंधारात राहणार नाही याची काळजी घ्या तीन महिन्यांच्या आत पालघर जिल्हा भारनियमन मुक्त करून ग्राहकांना उत्तम सेवा द्या
मनोर : जिल्ह्यातील एकही गाव यापुढे अंधारात राहणार नाही याची काळजी घ्या तीन महिन्यांच्या आत पालघर जिल्हा भारनियमन मुक्त करून ग्राहकांना उत्तम सेवा द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र विज मंडळाच्या वितरण व महापारेषणाच्या समस्यांबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या संकुलात ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार विलास तरे, आमदार पास्कल धनारे, आ. हितेंद्र ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व जि.प. मुख्य कार्यकारी दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात एकूण ९ लाख ३६ हजार वीजग्राहक असून त्यापैकी ६ लाख १९ हजार वसई तालुक्यात आहेत. उर्वरीत ३ लाख १७ हजार पालघर डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात नेहमी होत असलेल्या भारनियमनाचा फटका १ लाख ४० हजार वीज ग्राहकांना बसतो आहे.
या सर्वांना भारनियमन मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर कारवाई करावी व जिल्ह्यातील आदिवासी गावे तसेच १७५ पाडे व वाड्या यांच्या घरापर्यंत विज जोडण्या पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्षमतेने व जबाबदारीने कामे करावीत असे निर्देश त्यांनी दिले. (वार्ताहर)