फळपीक लागवडीत पालघर प्रथम; काजूच्या जवळपास दाेन लाख कलमांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:18 AM2021-01-28T01:18:07+5:302021-01-28T01:18:44+5:30
जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेत २५ हजार ७५९ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
पालघर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ७२ लाभधारकांनी विविध फळपिकांची २५५८.०७ हेक्टरवर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. काजूच्या जवळपास दाेन लाख कलमांची लागवड करण्यात आली आहे. एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत चिकू पिकाची राज्य स्तरावरून निवड करण्यात आली असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेत २५ हजार ७५९ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी २१ हजार १९५ घरे पूर्ण झालेली आहेत. याचबरोबर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि आदिम योजनेंतर्गत ६१०६ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली असून यापैकी चार हजार ०६ घरकुले पूर्ण झालेली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये ६८,८४३ कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कातकरी उत्थान अभियानांतर्गत खाजगी जागेवरील ३१८८ घरांचे, वनविभागाच्या जागेवरील ८२० घरांचे, शासकीय जागेवरील ३९३ घरांचे आणि गावठाण जागेवरील २७५५ घरांचे अतिक्रमण नियमानाकुल करून आदिवासींच्या नावे करून दिली आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
४४ हजार ५२२ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर
जिल्हा वन हक्क समिती कक्ष स्थापन करून जिल्ह्यात वन हक्क कायद्यांतर्गत आजअखेर ४४ हजार ५२२ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करण्यात आले. त्याचे क्षेत्र ५०३८५ एकर इतके आहे. मागील चार महिन्यांत ४२२९ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करून, आदिवासींना त्यांचा हक्क देण्यात आला आहे. तसेच ४३७ सामूहिक वन हक्क दावे मंजूर असून त्याचे क्षेत्र ५५ हजार ४१ एकर इतके आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना शिवभोजन योजना सुरू करून वर्षभरात चार लाख ५३ हजार ११९ थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात मजुरांना गावातच रोजगार देण्यासाठी नऊ हजार ५५५ एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध केली आहेत.