पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:28 AM2017-07-19T02:28:54+5:302017-07-19T02:28:54+5:30
संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलास
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/वसई : संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, बोईसर या परीसराची स्थिती बरी होती. या मुसळधार पावसाचे पाणी मुंबई, अहमदाबाद मार्गावर साचून प्रदीर्घ काळ भीषण वाहतूककोंडी झाली. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळली.
सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई या शहरांसह ग्रामीण भागात व नवघर एसटी स्टँडवर पाणी तुंबले होते. पापडी-बंगली रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन विभागाने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुुरु झाली. गेले अनेक दिवस गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून पुन्हा झोडपून काढले. पावसाच्या तडाख्याने वसईतील सखल भागात पाणी तुंबले होते. विरार पश्चिमेला विवा कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी साचून राहिले होते. नालासोपारा सेंट्र्ल पार्क रस्ता पाण्याखाली गेला होता. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते.
मुंबई अहमदाबाद हायवेवर ससूपाडा नजिक हायवेवर दोन्ही दिशेला पाणी तुंबले होते. तर पाण्याच्या प्रवाहालाही प्रचंड वेग होता. त्यामुळे हायवेवरील वाहतूक धिम्या गतीने जात होती. दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली होती. गेल्याच आठवड्यात वसई वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी हायवेवर याठिकाणी पाणी साचून रहात असल्याने फुटलेला जुना पाईप बदलून नवीन पाईप टाकून घेतला होता. त्यानंतरही पाण्याचा निचरा होत नाही. डोंगरातून पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची सोय नाही. रस्त्यापलिकडे पूर्वी पावसाचे पाणी साचून राहण्यासाठी मोकळी जागा होती. पण, त्याठिकाणी आता मातीचे मोठे भराव झाल्याने पावसाळी पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
बारा गावांचा संपर्क तुटला
तानसा नदीला आलेल्या पूरामुळे भाताणे-पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई तालुक्यातील बारा गावांचा संपर्क तुटला आहे.
रात्रीपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने तानसा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पूलापलिकडील भाताणे, नवसई, थळ््याचा पाडा, आडणे, जांभुळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा या बारा गावांचा संपर्क तुटला आहे.
या बारा गावातील गावकऱ्यांना दूरवरच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यामुळे एस.टी. आणि काळी-पिवळी याद्वारे होणारी वाहतूक थांबली आहे. त्याचा फटका चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना बसला आहे.