पालघर : ग्रा.पं. निवडणूकीत शिवसेनेची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:08 AM2018-03-01T02:08:08+5:302018-03-01T02:08:08+5:30
तालुक्यातील माहीम, सरावली ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकावला असून या, खैरेपाडा ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे.
पालघर : तालुक्यातील माहीम, सरावली ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकावला असून या, खैरेपाडा ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर बिनविरोध निवडून आलेल्या शिलटे ग्रामपंचायतीत सरपंचासह बहुजन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आहेत.
माहीम ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून सेनेच्या असलेल्या सत्तेला राखीव भूखंडाची विक्री, जल प्रदूषण, बेकायदेशीर अतिक्र मणांकडे केलेली डोळेझाक आदी कारणांमुळे मतदारांनी सुरुंग लावून इतर पक्षांनी बनविलेल्या परिवर्तन पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. मात्र जल प्रदूषणाची वाढती व्याप्ती, अतिक्रमणांवरचा अंकुश नसणे, कारखानदारांकडून होणारी करवसुली आदी प्रकरणात परिवर्तन पॅनलकडून कोणतेही सकारात्मक बदल झाल्याचे मतदारांना आढळून आले नाहीत.परिणामी नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शहा, माजी सरपंच विकास मोरे आदींच्या विकासाच्या प्रचारावर वडराई वगळता माहीम, रेवाळे, हरणवाडी आदी प्रभागातील मतदारांनी पुन्हा आपला विश्वास व्यक्त करून पंचायत समितीचे माजी सभापती दीपक करबट यांना मतदारांनी निवडून दिले. माहीम ग्रामपंचायतीतील १२ जागांपैकी १२ सदस्यपदाच्या जागा जिंकून सेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.तर परिवर्तन पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. सरावली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या महिला उमेदवार लक्ष्मी चांदणे यांच्यासह १२ सदस्य निवडून आले येथेही सेनेने भगवा फडकविला तर ग्रामविकास आघाडीला ३ तर शिवसाई पॅनलला २ जागा मिळाल्या
खैरेपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना-भूमिसेना-शिवशक्ती पुरस्कृत ग्रामविकास आघाडीच्या महिला उमेदवार भावना धोडी या सरपंचपदासाठी निवडून आल्या असून १७ पैकी १५ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे तर भाजपाला १ जागेवर समाधान मानावे लागले बजरंग दलाने मात्र १ जागा जिकून तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शिरकाव केला आहे.