पालघर लोकसभा पोटनिवडणूक : काँग्रेसच्या गावितांना भाजपाची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:13 AM2018-05-09T06:13:56+5:302018-05-09T06:13:56+5:30
भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन भाजपाला जोरदार धक्का दिला. तर काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना गळाला लावून भाजपाने चतुर खेळी केली. आपण काँग्रेस सोडणार नसून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या संपर्कात आहोत, असे दुपारपर्यंत सांगणाºया गावितांनी सायंकाळी भाजपात प्रवेश केला.
आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना भाजपाने पालघरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मात्र पत्रकार परिषदेत जाहीर केले. ते बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माजी खासदार चिंतामण वनगांच्या मुलास (श्रीनिवास) उमेदवारी देताना शिवसेनेने जे काही केले तसे त्यांनी वागायला नको होते. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गावितांना विजयी करणे हीच स्व. वनगा यांना उचित श्रद्धांजली ठरेल, असे फडणवीस या वेळी म्हणाले.
गावित हे पूर्वी जनता दलात होते आणि त्यांनी नंदुरबारची लोकसभा निवडणूकही लढविली होती. पुढे आजचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पक्षात ते गेले व नंतर काँग्रेसमध्ये जाऊन आमदार व राज्यमंत्री बनले. मंगळवारी ते भाजपावासी झाले.
सत्य लवकरच बाहेर येईल
श्रीनिवास वनगा यांची कोणी दिशाभूल केली, त्यांना कोणी खोटी माहिती दिली याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. निवडणुकीनंतर आपण त्यावर बोलू, असे मुख्यमंत्री म्हणाले. पालघरमध्ये शिवसेनेने जे काही केले त्याचा युतीवर काही परिणाम होईल का, या प्रश्नात ते म्हणाले, कशाकशावर परिणाम होतो ते पाहू.