राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:58 AM2024-04-27T05:58:55+5:302024-04-27T06:00:43+5:30
पालघर लोकसभेतही हे चित्र दिसू लागल्याने कुठल्याही स्थितीत महायुतीलाच विजयी करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत
हितेन नाईक
पालघर : पालघर लोकसभेची जागा भाजप की शिंदेसेनेला मिळणार, याविषयी संभ्रम असतानाच बहुजन विकास आघाडीला महायुतीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुतीमध्ये बविआला घेऊन त्यांच्या उमेदवाराला कमळ चिन्हावर उभे केले जाण्याबाबत चाचपणी सुरू आहे.
मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोअर कमिटी, पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, अशा चार विधानसभांचे केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, सुपर वॉरियर यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महायुतीचे घटक म्हणून भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे चिन्ह घेऊन महायुतीचा उमेदवार आपल्यासमोर दिला जाईल. त्याचबरोबरीने ‘बविआ’ हा चौथा पर्याय उपलब्ध झाल्यास लग्न आपल्या घरचे आहे, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, त्यामुळे सर्वांनी जोरकस प्रयत्न करून महायुती जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणायचे आहे, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिल्या.
राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर काही घटक पक्ष महाविकास आघाडीकडे वळत असल्याचे चित्र आहे. पालघर लोकसभेतही हे चित्र दिसू लागल्याने कुठल्याही स्थितीत महायुतीलाच विजयी करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. मनोरच्या बैठकीत महायुतीतून फक्त भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदेसेनेचे खा. राजेंद्र गावित यांच्यासह महायुतीमधील एकाही प्रमुख पदाधिकाऱ्याला या बैठकीला बोलाविण्यात आले नव्हते.