पालघर लोकसभेची पोटनिवडणूक : श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:39 AM2018-05-09T05:39:11+5:302018-05-09T05:39:11+5:30

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

Palghar Loksabha by-election: Srinivas Vananga File application | पालघर लोकसभेची पोटनिवडणूक : श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल

पालघर लोकसभेची पोटनिवडणूक : श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल

googlenewsNext

- हितेन नाईक/सुरेश काटे

पालघर/तलासरी - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या अकाली मृत्यूनंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी, शिवसेनेकडून वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा हे शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणा सकाळी करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता हुतात्मा स्तंभाला वंदन करून, शिवसेनेने ८ ते १० हजार शिवसैनिकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, ठाण्याचे खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घोडा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार शांताराम मोरे, आमदार किणीकर, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण आणि चिंतामण वनगा यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
ज्या भाजपासाठी दिवंगत वनगा यांनी आयुष्याची ३५ वर्षे वेचली; त्यांच्या कार्याची, त्यागाची किंमत भाजपाला समजली नाही. श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, सेनेने वनगा कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून, सेना आणि आमचे कार्यकर्ते वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी राहतील, असा विश्वास शिंदे यांनी दिला. दिवंगत वनगा यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढविली जात असल्याचे ते म्हणाले. श्रीनिवास वनगांना निवडून आणणे हीच वनगांना खरी श्रद्धांजली असेल असे सांगून, शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा विजयापासून सेनेला कोणी रोखू शकत नसल्याचे ते म्हणाले.

शाब्दिक बाचाबाची
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या सेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी अडविल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी कबाडी यांनी शिवीसदृश शब्द वापरल्याने, दालनात त्याचे पडसाद उमटले. याचा जाब कबाडींना विचारे यांनी विचारला असता, गैरसमजुतीमधून हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसैैनिकांविरुद्ध गुन्हा
सेनेचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान १०० मीटर प्रतिबंधित भागात प्रवेश करून सभा घेतल्याने ५० शिवसैैनिकांविरोधात सातपाटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर यांनी दिली. यादरम्यान, आचारसंहिता भंग करण्यात आली आहे का? याचाही तपास संबंधित यंत्रणा करीत आहे.


दामू शिंगडा यांना काँग्रेसची उमेदवारी - अशोक चव्हाण

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने माजी खासदार दामू शिंगडा यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली असून त्यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिली.
भाजपाने पैसा व सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी सुरू केली आहे. गावित यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असला तरी काँग्रेसशी गद्दारी करणाºया गावितांना पालघर मतदारसंघातील जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
चव्हाण म्हणाले, गावित गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते. काँग्रेसमध्ये राहून त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. शिवसेनेने भाजपा उमेदवार पळविला, म्हणून भाजपाने गावितांना जवळ केले. सर्वांत मोठा पक्ष अशा वल्गना करणाºया भाजपाला स्वत:चा एक उमेदवार मिळू नये, हे लांछनास्पद आहे. पक्षनिष्ठा वगैरे प्रकारच शिल्लक नसल्याचे गावितांच्या पक्षांतराने अधोरेखित झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
राजेंद्र गावित दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळणार नाही, याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अशा पडेल उमेदवाराला घेऊन भाजपाने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. जनता अशा पडेल उमेदवाराला आणि भाजपाला पुन्हा तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी या वेळी केली.
 

Web Title: Palghar Loksabha by-election: Srinivas Vananga File application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.