Palghar Mob Lynching: गडचिंचलेत भयाण शांतता; आरोपींचा कसून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:37 AM2020-04-24T02:37:41+5:302020-04-24T02:38:33+5:30
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या आठवड्यापासून चोर-दरोडेखोरांची अफवा पसरवली जात होती. ‘त्या’ अफवेमुळे दोन साधू व त्यांच्या कारचालकाचे हत्याकांड झाले असून आता आरोपींना शोधण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केल्याने गडचिंचले व परिसरातील गावांत आता भयाण शांतता असून सन्नाटा पसरलेला आहे.
सामूहिक हत्येनंतर गडचिंचले गावात आता फक्त पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. हत्याकांडानंतर पोलिसांनी ११० जणांना अटक केली असून १०१ जणांना पोलीस कोठडी मिळालेली आहे, तर ९ अल्पवयीनांना भिवंडी कारागृहात पाठविण्यात आले आहे. जंगलात फरार झालेल्या २५० ते ३०० जणांचा पोलीस शोध घेत आहेत. गावात काही घरे बंद असून चिटपाखरूही फिरताना दिसत नाही. गावात आता भयाण शांतता पसरली आहे. दोन साधू व त्यांचे चालक यांची हत्या ही केवळ अफवेमुळे झाली आहे, असे सांगितले जात आहे. मात्र आता गावात सुरू असलेल्या धरपकडीमुळे भीतीने गावांत सन्नाटा पसरला आहे.
लोकसंख्या १२५०
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे गडचिंचले हे गाव अतिदुर्गम भागातील असून दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशालगत कासा येथून २५ कि.मी. तर तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर आहे. ग्रामपंचायतीमध्ये दिवशी आणि गडचिंचले या दोन गावांचा समावेश होत असून गडचिंचले या गावाची लोकसंख्या १२५० च्या जवळपास आहे. या गावामध्ये चौकीपाडा, हेदीचापाडा, शेतपाडा, पाटीलपाडा, साठेपाडा, खडकीपाडा, भुरकुडपाडा, चोल्हेरपाडा असे एकूण आठ पाडे येतात, तर दिवशी गावात एकूण ६ पाडे येतात.