पालघर नगरपरिषदेची महत्त्वाची कागदपत्रे आढळली खाजगी इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:20 AM2019-07-14T00:20:43+5:302019-07-14T00:20:47+5:30

पालघर नगरपरिषदेच्या बिल्डिंग बांधकाम परवानगीच्या शेकडो फायलींसह शिक्के अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे वाघूळसार नजीकच्या ‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या २०१ या फ्लॅटमध्ये आढळून आली.

Palghar Municipal Council found important documents in a private building | पालघर नगरपरिषदेची महत्त्वाची कागदपत्रे आढळली खाजगी इमारतीत

पालघर नगरपरिषदेची महत्त्वाची कागदपत्रे आढळली खाजगी इमारतीत

Next

हितेन नाईक 
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या बिल्डिंग बांधकाम परवानगीच्या शेकडो फायलींसह शिक्के अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे वाघूळसार नजीकच्या ‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या २०१ या फ्लॅटमध्ये आढळून आली. नगरपालिकेचे काही अधिकारी, नगरसेवकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी पालघर पोलिसात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमधील सर्व दस्तावेज ताब्यात घेतले. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली.
कांचन पारिजात या इमारतीच्या फ्लॅटमध्ये मिळालेल्या कागदपत्रांमध्ये नगरपालिका कार्यालयातील बांधकामच्या परवानगीच्या फाईल्स, अर्ज-परवानगीच्या पत्रावर मारण्यात येणारे आवक जावकचे शिक्के, रहिवास, वाणिज्य औद्योगिक, लघू औद्योगिक, सामान्य सुविधा केंद्रासाठी दुकाने प्रयोजनार्थ नकाशांना मान्यता देण्याच्या कागदपत्रांवर मारण्यात येणारा शिक्का असे साहित्य सापडले आहे. बोगस औषध खरेदी घोटाळा, विद्युत साहित्य खरेदी घोटाळा, भुयारी गटार निधी घोटाळा अशा अनेक छोट्या मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणाने नगरपालिका वादग्रस्त ठरली आहे. अशावेळी वसईतील एका बिल्डरच्या खाजगी फ्लॅटमध्ये नगरपालिका कार्यालयातील फाईल्स आणि शिक्के सापडण्यासारखी गंभीर बाब नगरपालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सहभागाशिवाय शक्य नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या फ्लॅटमध्ये आढळलेल्या सुमारे १२७ फाईल्स, शिक्के, कॉम्प्युटर, प्रिंटर, नगरपालिकेचा डीपी नकाशा असे महत्त्वपूर्ण दस्तावेज पाहिल्यावर हे नगरपालिकेचे दुसरे कार्यालय तर नाही ना? अशी शंका मनात निर्माण होते.
नगरपरिषदेचे अलीकडेच बदली होऊन गेलेले नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर हे पालघरमधील एका फ्लॅटमध्ये असून तेथे काही आर्किटेक्ट, बिल्डरांसोबत त्यांच्या बिल्डिंग परवानगी फाईलमधील त्रूटी कमी करून त्यावर आधीच्या तारखेच्या (बॅक डेटेड) सह्या करण्याचे काम सुरू असल्याची महिती भाजपाचे गटनेते भावानंद संखे, नगरसेवक अरुण माने यांना कळल्यावर त्यांनी थेट फ्लॅटमध्ये शिरकाव केला. त्यावेळी १० ते १५ लोकांसोबत क्षीरसागर काही फायलींवर शिक्के आणि सह्या करीत असल्याचे निदर्शनास आले होते. यात नगरपालिकेचे नगररचना अभियंता दर्शन नागदासह पालघरमधील काही आर्किटेक्ट, आणि बिल्डरही होते. या नगरसेवकांना पाहिल्यानंतर सर्वांची एकच पळापळ सुरू झाली. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे घटनास्थळी उपस्थित झाले. फ्लॅटमध्ये गर्दी झाल्याचा फायदा उचलत क्षीरसागरच्या खोलीतील टेबलावरील सुुमारे दीड लाखांची रोख रक्कम लंपास करण्यात आली.
>अनेक बेकायदा प्रस्तावांना फ्लॅटमधून दिल्या परवानग्या?
अभियंता क्षीरसागर हे १ जून २०१७ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत नगरपरिषद कार्यरत होते. त्यानंतर त्यांना आयुक्त तथा संचालक यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, २० एप्रिलपर्यंतच्या माझ्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीदरम्यान नगरपालिकेत क्षीरसागर मला कधीच दिसला नसल्याचे तत्कालीन नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या काही फायलींचे हँडवर्क करण्यासाठी आपण या फ्लॅटमध्ये आल्याचे अभियंता क्षीरसागर यांचे म्हणणे आहे.
>सदगुरू हॉटेलच्या मागे एका बिल्डिंग उभारण्याच्या एका प्रस्तावाला बेकायदेशीररित्या परवानगी देण्यात आल्या असून या फ्लॅटमध्ये अशा अनेक प्रस्तावांना परवानग्या देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या फ्लॅटमधील अनेक सह्या करण्यात आलेल्या फायली उपस्थितांपैकी काही व्यक्तींनी नेल्याची माहिती पुढे येत असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Palghar Municipal Council found important documents in a private building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.