सरणासह मृतदेह गेला वाहून; स्मशानभूमी नसल्याने नदीकाठीच अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 05:38 AM2023-07-29T05:38:32+5:302023-07-29T05:40:51+5:30
डुकलेपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने नदीकाठीच अंत्यसंस्कार करावे लागतात.
मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात आवढानी ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका गावकऱ्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्याकरिता डुकलेपाडा येथे हात नदीकाठावर सरण रचले गेले. मृतदेह सरणावर ठेवला. मात्र नदीचे पाणी वाढले आणि मृतदेह सरणासह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार घडला. डुकलेपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने नदीकाठीच अंत्यसंस्कार करावे लागतात.
आता तरी आमच्या गावात स्मशानभूमी देणार का? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेल्या अवढानी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डुकलेपाडा येथे गुरुवारी अल्पशा आजाराने विष्णू नारायण शेलार यांचे निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नसल्याने नेहमीप्रमाणे हात नदीच्या काठी अंत्यविधी करण्यासाठी तयारी करण्यात आली.
भरपावसात गावकऱ्यांनी नदीकाठी सरण रचून त्यावर त्यांचा मृतदेह ठेवला. त्यांना अग्नीही दिला गेला, मात्र त्याचवेळी पुराचे पाणी झपाट्याने वाढले. त्या पाण्यात अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेला. पालघर जिल्ह्यात अनेक गावांत अद्यापही स्मशानभूमी नसल्याने लोक नदीकाठी अंत्यसंस्कार करतात.