पालघर पोलीस दलात खांदेपालट; अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:36 PM2020-01-17T23:36:23+5:302020-01-17T23:36:36+5:30
पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहा. निरीक्षकांचा समावेश
वसई : पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी नुकत्याच बदल्या केल्या आहेत.
वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांची अनैतिक मानवी वाहतूक कक्षात नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या जागी आता वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनंत पराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून जवाहर पोलीस ठाण्यातील गंगाराम वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आनंद मुदलियार यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे महेश विद्याधर शेट्टी यांच्याकडे आता अर्नाळा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा भार देण्यात आला आहे. त्यामुळे अर्नाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांची आता नियुक्ती जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वसई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिळेकर यांची देखील नियुक्ती तुळींज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पालघर येथील पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांच्याकडे वालीव पोलीस ठाण्याचा भार देण्यात आला आहे. किंबहुना अर्नाळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अरुण भिसे यांची रवानगी आता बोईसर पोलीस ठाण्यात तर तुळींज पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मल्हार थोरात यांना थेट कासा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.
दुसरीकडे मागील आठवड्यातच सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप यांचे अकाली निधन झाले होते. त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील सुनील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून तारापूर पोलीस ठाण्याचे सर्जेराव कुंभार यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
अधिकारी वर्गात माजली खळबळ
वसई-विरार, सफाळा आदी भागात पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी मोठा खांदेपालट केल्याने अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय पोलीस अस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार या बदल्या करण्यात आल्याचे पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी स्पष्ट केले आहे. अनेक अधिकाºयांना गैरसोयीच्या ठिकाणी जावे लागल्यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याचे समजते.