पालघर पोलिसांनी वाचवले २२ नागरिकांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:29 AM2020-08-06T01:29:20+5:302020-08-06T01:29:48+5:30
संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते.
हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वसामान्यांचे जीवन अस्तव्यस्त करून टाकले असताना अनेक सखल भागात साचलेल्या पाण्यातून, प्रवाहातून पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल समर्थ असल्याचे दाखवून दिले.
संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते. केळवा पोलीस ठाणे हद्दीत माकूनसार या गावाच्या पुढे असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्या आसपास खारटनमध्ये पाण्याची पातळी वाढून सागर व सारिका चौधरी हे दांपत्य शेतावरील घरात अडकले होते. त्यांच्याबरोबरच अन्य दहा-बारा पुरुष व स्त्रिया समुद्राला भरती आल्याने त्यात सापडले असताना सपोनि मानसिंग पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी फायबर बोटीच्या साह्याने पाण्यात उतरून त्या सर्वांची सुटका करून त्यांना बाहेर काढले.
सातपाटी सागरी पोलीस ठाणे हद्दीत पानेरी नदीजवळ हरिओम मिश्रा हा पाण्याची पातळी वाढल्याने झाडावर चढला होता. सुटका व्हावी म्हणून तो मदतीची याचना करीत असल्याची माहिती सपोनि जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या टीमला केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या इसमाची सुटका करून त्याच्यावर उपचार केले. सफाळा पोलीस ठाणे हद्दीत लालठाणे गावाच्या बाजूला आणि घोलवड पोलीस हद्दीत एका रस्त्यावर दरडसदृश्य माती सपोनि सुनील जाधव आणि प्रकाश सोनावणे यांच्या टीमने दूर केली.