पालघरवासीयांची घरीच राहण्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:03 AM2020-06-09T00:03:40+5:302020-06-09T00:04:00+5:30
ट्रेन बंदमुळे निर्णय : अवघ्या दोन बस सोडल्या
पालघर : जिल्ह्यातील बहुतांशी चाकरमानी हे मुंबई-ठाणे येथे नोकरीनिमित्त जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या उपनगरी लोकल सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील चाकरमान्यांनी सोमवारी मुंबईत जाणे टाळल्याने अवघ्या दोन एसटी बस मंत्रालय आणि बोरिवलीसाठी सोडण्यात आल्या.
लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईत सोमवारपासून खाजगी व सरकारी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवारी मुंबई-ठाणे भागांतील कार्यालये गाठण्यासाठी महामार्गावर गाड्यांची तर बस पकडण्यासाठी एकच गर्दी जमल्याने चित्र सर्वत्र दिसून येत होते.
पालघर जिल्ह्यातून मुंबई, ठाणे व गुजरात राज्यात सरकारी कार्यालयात व खाजगी आस्थापनात नोकरीनिमित्त जाण्यासाठी ७५ टक्के (डहाणू ते वैतरणादरम्यान दररोज सुमारे दीड लाख) चाकरमानी हे रेल्वे गाड्यांचा वापर करतात. परंतु, सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने ९५ टक्के चाकरमान्यांनी आपल्या घरीच राहणे पसंत केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षकासह अन्य कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यातच राहत असल्याने बाहेरून येणाºया कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
तसेच २२ मे पासून शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आधीच सुरुवात झाल्याने सोमवारी कार्यालयात येण्यासाठी कुठे गर्दी जमणे, लांबच लांब रांगा लागल्याच्या घटना कुठे घडल्या नसल्याचे पाहावयास मिळाले.