हुतात्मा वंदनेसाठी आज पालघर उत्स्फूर्त बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:46 AM2018-08-14T02:46:53+5:302018-08-14T02:47:11+5:30
इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
- हितेंन नाईक
पालघर : इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून संपूर्ण पालघर शहरातील व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले जाणार आहेत.
७ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीला सुरु वात करण्यात आली. देशभरातून ‘करेंगे या मरेंग’ ह्या निर्धाराने जिल्ह्यातील देशबांधव मोठ्या संख्येने तिच्यात सहभागी झाले होते. पालघर मध्येही १४ आॅगस्ट रोजी कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सातपाटी, शिरगाव, धनसार, अल्याळी, खारेकुरण, मुरबे, नवापूर, पामटेम्भी, पोफरण, आलेवाडी, उनभाट, आदी भागातून हजारो देशभक्त सहभागी झाले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हे स्वयंसेवक इंग्रजांनो चालते व्हा, अशा घोषणा देत कचेरीच्या दिशेने हळूहळू कूच करीत होते.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण तंग होते. अशावेळी इंग्रजांनी मोर्चा वर लाठीमार करायला सुरुवात केली. त्यामुळे नांदगावच्या सेवादलाचे प्रमुख गोविंद गणेश ठाकूर ह्यांनी वंदे मातरमची घोषणा देत तिरंगा फडकवीत कचेरीवर चाल केली. ह्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने जवळून केलेल्या गोळीबारात ह्या १७ वर्षीय देशभक्ताला हौतात्म्य प्राप्त झाले. हया दरम्यान सातपाटीचे काशीनाथभाई पागधरे, पालघरचे राम प्रसाद तेवारी, मुरब्याचे रामचंद्र चुरी, तर सालवडचे सुकुर मोरे ह्यां ५ देशभक्तांनाही हौतात्म्य प्राप्त झाल.
ह्या ५ ही हुतात्म्यांना १४ आॅगस्ट १९४४ पासून १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारक ते हुतात्मा स्तंभा पर्यंत मूक मिरवणूक काढली जाते. १२ वाजून ३९ मिनिटांनी शालेय विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत गाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.