पालघरला मनसेचे उपोषण सुरू
By admin | Published: December 16, 2015 12:23 AM2015-12-16T00:23:53+5:302015-12-16T00:23:53+5:30
शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार, शुद्ध पाणी, वीज मिळावे या मागणीला पाच महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या
पालघर : शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार, शुद्ध पाणी, वीज मिळावे या मागणीला पाच महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोनशे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नित्कृष्ट दर्जाचे अन्न, तुटलेली, घाणेरड्या अवस्थेतील शौचालये, अभ्यासक्रमासाठी अपुरा पुस्तक पुरवठा, गढुळपाणी इ. नानाविध समस्येशी नेहमीच सामना करावा लागत आहे. यात सुधारणा करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या संदर्भात जिल्हाधिकारी पालघर, अप्पर आयुक्त ठाणे, प्रकल्प अधिकारी जव्हार, प्रकल्प अधिकारी डहाणू यांना निवेदने देऊनही पाच महिन्यात कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आदिवासी गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अरूण कदम यांनी करून त्यांच्या दोनशे कार्यकर्त्यांनी आजपासून पालघर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. यावेळी दर्जेदार शिक्षण, संगणक, सुसज्ज इमारत, शौचालय, क्रीडांगण, शैक्षणिक साहित्य मिळावे, प्राथमिकव माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी, शासकीय आश्रमशाळा, जव्हार व डहाणू प्रकल्पातील स्त्री अधिक्षकांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावीत, मेंढवण खुटल शासकीय आश्रमशाळांच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, कावळे आश्रमशाळा मधील विद्युत पुरवठा सुरळीत करून शौचालय वापरासाठी खुली करावीत, जिल्ह्यातील सरपंचाचे मानधन ५ हजार करावेत, जव्हार मधील ग्रामपंचायत मध्ये पेसा कायद्यांतर्गत निधीच्या वापरावरील बंदी हटवावी. प्राथमिक व ग्रामीण रूग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वाढवण, जिंदाल बंदर रद्द करावे इ. ३९ मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोनशे मनसे कार्यकर्त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली. (वार्ताहर)